CoronaVirus : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे 12 नवे रुग्ण; पोलीस, पत्रकार व आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 06:03 PM2020-04-26T18:03:52+5:302020-04-26T18:54:34+5:30
CoronaVirus : नव्याने आढळून आलेल्या 12 रुग्णांपैकी डोंबिवली पूर्वेतील 30 व 33 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झालेली आहे.
कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचे 12 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 129 झाली आहे. नव्या रुग्णांमध्ये पोलीस, पत्रकार आणि आरोग्य कर्मचा-याचा समावेश आहे.
नव्याने आढळून आलेल्या 12 रुग्णांपैकी डोंबिवली पुर्वेतील 30 व 33 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झालेली आहे. कल्याण पूर्वेतील 43 वर्षे महिलेलाही कोरोना झाला आहे. हे तिघेही मुंबई येथे आरोग्य कर्मचारी आहेत. त्याचबरोबर टिटवाळ्य़ातील 52 वर्षीय आरोग्य कर्मचारी असलेल्या महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. मांडा टिटवाळ्य़ातील 12 वर्षीय मुलगी, डोंबिवली पश्चिमेतील 50 वर्षीय महिलाही व 30 वर्षीय तरुण हे तिघे कोरोना रुग्णाच्या सहवासात आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
कल्याण पूर्वेतील व डोंबिवली पूर्वेत राहणा-या दोन पोलिसांना कोरोना झाला आहे. डोंबिवली पूर्वेतील मुंबई येथे कार्यरत असलेल्या 30 वर्षीय पत्रकारासही कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याशिवाय डोंबिवली पश्चिमेतील 16 वर्षीय तरुणीला कोरोना झाला आहे. त्याचबरोबर 45 वर्षीय इसमाला कोरोना झाला असून तो ही डोंबिवली पश्चिमेत वास्तव्याला आहे. या दोन्ही रुग्णांचे वैद्यकीय चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
आतापर्यंत आढळून आलेल्या एकूण रुग्णांपैकी 40 रुग्णांना उपचारांती घरी सोडण्यात आले आहे. आजच्या घडीला 86 रुग्ण उपचार घेत आहेत.