coronavirus : कल्याण-डोंबिवलीत एकाच दिवसात सापडले कोरोनाचे 13 नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 04:55 PM2020-04-18T16:55:29+5:302020-04-18T16:59:11+5:30
नव्याने आढळून आलेल्या 13 रुग्णांमुळे महापालिका हद्दीत कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 73 झाली आहे.
कल्याण - कल्याणडोंबिवलीत कोरोना बाधितांचा आकडा कमी होताना दिसून येत नाही. आज एकाच दिवशी 13 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 12 रुग्ण हे डोंबिवलीतील आहे. एक रुग्ण हा कल्याणमधील आहे. डोंबिवली कोरोना रुग्णांचा हॉटस्पॉट झाली आहे. नव्याने आढळून आलेल्या 13 रुग्णांमुळे महापालिका हद्दीत कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 73 झाली आहे. नव्या 13 रुग्णांमध्ये एक वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे.
1 वर्षाच्या मुलीस कोरोनाची लागण झाली आहे. ती डोंबिवली पश्चिमेत राहणारी आहे. या एक वर्षाच्या मुलीसह डोंबिवली पश्चिमेत तीन महिला व तीन पुरुषांना कोरोनाची लागण झाली आहे. डोंबिवली पूर्वेतील तीन महिला व तीन पुरुषांना लागण झालेली आहे. हे सगळे जण कोराना बाधित रुग्णांच्या सहवासात आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
कल्याण पश्चिमेतील 65 वर्षीय वृद्धाला लागण झाली आहे. त्यांचा परदेश गमनाचा इतिहास आहे. कल्याण डोंबिवलीत दररोज नवे रुग्ण मिळून येण्याची संख्या 1 ते 6 या दरम्यान होती. त्यात आज अचानक लक्षणीय वाढ झाली आहे. आत्तार्पयत उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांपैकी 26 जणांना उपचारांती घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 45 आहे. 45 पैकी 11 रुग्ण हे नियॉन या रुग्णालयात उपचार घेत आहेत. हे खाजगी रुग्णालय कोरोनासाठी डेडीकेटेट रुग्णालय घोषित केले आहे.
घरी राहा असे आवाहन वारंवार केले जात आहे. तसेच गर्दी टाळण्यासाठी आयुक्त, पोलिस, बाजार समितीकडून विविध आदेश काढून उपाययोजना केल्या जात आहे. तरी देखील लोक घरी राहण्याच्या आवाहनाला 100 टक्के प्रतिसाद देत नाहीत. काही टूकार मंडळी सरकारी नियमांचा भंग करीत आहे. तसेच काही जणांकडून सोशल डिस्टसिंग पाळले जात नाही. त्यामुळे डोंबिवलीत रुग्णांची संख्या वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे. उपचारासाठी सरकारी यंत्रणा सज्ज असल्या तरी लागण टाळणे याची खबरदारी नागरीकांनी घेणे आवश्यक आहे. ती घेतली जात नाही.