Coronavirus: कल्याण-डोंबिवलीत आढळले १४ नवे रुग्ण; दोन पोलीस कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2020 11:49 PM2020-05-03T23:49:12+5:302020-05-03T23:49:22+5:30
बदलापूरमध्ये कोरोनाचे दोन नवे रुग्ण आढळले आहेत. त्यातील एक कात्रप तर दुसरा वडवली भागातील आहे.
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचे १४ नवे रुग्ण आढळले आहेत.या रुग्णांमध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महापालिका क्षेत्रातील एकूण रुग्णांची संख्या १९५ झाली आहे.
कल्याण पश्चिमेतील ३६ वर्षीय पोलिसाला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच, डोंबिवली पश्चिमेतील ४४ वर्षीय पोलिसालाही कोरोना झाला आहे. हे दोन्ही पोलीस मुंबईत कार्यरत आहेत. तसेच कल्याण पश्चिमेतील ३० व ३२ वर्षीय महिला, ३० वर्षीय तरुण, डोंबिवली पूर्वेतील ४४ वर्षीय महिला, कल्याण पश्चिमेतील ३९ व २६ वर्षीय महिला, डोंबिवली पश्चिमेतील ३३ वर्षीय पुरुष यांना कोरानाची लागण झाली आहे. हे सर्व कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. कल्याण पूर्वेतील ६६ वर्षीय इसम आणि २९ वर्षीय तरुण, डोंबिवली पश्चिमेतील ३३ वर्षीय तरुण, ४२ वर्षीय इसम, कल्याण पश्चिमेतील ५५ वर्षीय पुरुष यांना कोरोना झाला आहे.
या रुग्णांचा इतिहास अद्याप महापालिका आरोग्य खात्याकडे नाही. त्यामुळे हे पाच रुग्ण नवे रुग्ण म्हणून गणले गेले आहे. त्यांच्या संपर्कात अन्य कोण व कधी आले. तसेच या रुग्णांचा कुठे कुठे वावर होता याची माहिती काढली जात असून संपर्कात आलेल्यांना होम क्वारंटाइन केले जाणार आहे.
गरिबांसाठी कोविडवर मोफत उपचार : ठाणे महापालिका क्षेत्रातील गरीब रुग्णांसाठी प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत सफायर आणि वेदान्त या हॉस्पिटलमध्येही मोफत उपचार सुविधा रविवारपासून सुरू करण्यात आली आहे. गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांना कमीतकमी दरात योग्य उपचार मिळावेत, यासाठी महापालिका प्रशासन आग्रही होते. याच पार्श्वभूमीवर पिवळे-केशरी रेशनकार्डधारक व मध्यम उत्पन्न गटातील कोरोनाबाधित रूग्णांना सफायर आणि वेदान्त हॉस्पिटलमध्येही अत्याधुनिक सुविधेसह मोफत उपचार आणि पौष्टिक जेवणही विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
अंबरनाथमधील पोलीस कर्मचारी सुरक्षित
अंबरनाथ : अंबरनाथ पोलीस ठाण्यात कोरोनाबाधित रुग्णाचा प्रवेश झाल्यावर पोलीस ठाण्यातील २८ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातील दोघांचे अहवाल प्रलंबित आहेत. तर एका पोलिसाला कोरोनाची लागण झाली आहे. मात्र उर्वरित सर्व २५ पोलीस हे सुरक्षित आहेत. अंबरनाथमध्ये सर्वाेदयनगर येथे सापडलेला कोरोनाबाधित रुग्ण हा अंबरनाथ पोलीस ठाण्यात आल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या पोलिसांची तपासणी करण्यात आली होती. त्या तपासणीत एक पोलीस कर्मचारी हा कोरोनाबाधित असल्याचे समोर आल्यावर त्या पोलिसाच्या संपर्कात आलेल्या पोलिसांचीही चाचणी करण्यात आली. एकूण २८ पोलिसांची चाचणी केली. त्यातील २५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर दोघांचे अहवाल अजून प्रलंबित आहेत. तर एक कोरोनाबाधित रुग्णालयात उपचार घेत आहे.
बदलापूरमध्ये दोन कोरोनाबाधित
बदलापूर : बदलापूरमध्ये कोरोनाचे दोन नवे रुग्ण आढळले आहेत. त्यातील एक कात्रप तर दुसरा वडवली भागातील आहे. त्यामुळे बदलापूरमध्ये कोरोना बाधितांची संख्या ही ३७ वर गेली आहे. वालीवली रस्त्यावरील कैलासनगर भागात राहणारे ३४ वर्षीय व्यकतीला कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्यावर ठाणे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर कात्रप घोरपडे चौकातही २९ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे बदलापूरमध्ये आता कोरोनाबाधितांची संख्या ही ३७ वर गेली आहे. त्यातील ९ रुग्ण उपचार घेऊन घरी आले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे.