coronavirus : ‘शब-ए-बारात’च्या पार्श्वभूमीवर भिवंडीत 23 कब्रस्थान सील
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 09:06 PM2020-04-08T21:06:29+5:302020-04-08T22:01:52+5:30
प्रार्थना घरातून करण्याचे मुस्लिम बांधवाना अहवान
- नितिन पंडीत
भिवंडी - जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसांगणिक होणारी वाढ पाहता भिवंडीतील 23 कब्रस्थान ‘शब-ए-बारात' सणा निमित्ताने 24 तासांसाठी पोलीस प्रशासनाकडून सील करण्यात आले आहे. तसेच 'शब-ए-बारातसाठी' मुस्लीम धर्मियांनी घराबाहेर पडु नये, कब्रस्थानमध्ये येवुन प्रार्थना करता कामा नये, तसेच शब-ए-बारातची नमाज मशिदीत देखील अदा करू नये, असे आवाहन मुस्लीम बांधवांना भिवंडी पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मुस्लिम बांधवांचा शब-ए-बारातचा सण यंदा गुरुवारी 9 एप्रिल रोजी होणार असून, कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता भिवंडी पोलिस, महसूल, पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. यासाठी भिवंडी शहरातील 23 कब्रस्थान सील करण्यात आली आहे. शब-ए-बारातच्या दिवशी मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात कब्रस्थानमध्ये नमाज पठण करीत असतात. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून सुरक्षेसंदर्भातील सर्व खबरदारी घेतली जात असून, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपआयुक्त राजकुमार शिंदे यांनी केले आहे. तर सर्वच कब्रस्थान ट्रस्टींना भादवि अधिनियम 149 प्रमाणे नोटीसी बजावण्यात आल्या आहे.
दरम्यान ,शब-ए-बारातच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी भिवंडी शहरात संचालन केले असून खबरदारी म्हणून शहरात आज पासूनच 24 तास मोठ्या प्रमाणात नाक्या नाक्यावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर एसआरपीएफ जवानांचे पथक शहरातील 6 ठिकाणी तैनात करण्यात आले आहे.