Coronavirus: जिल्ह्यातील 96 गावपाड्यांना 24 टँकरने पाणीपुरवठा; टंचाईच्या कामांसाठी ग्रामसभेचा ठराव शिथील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 05:34 PM2020-04-12T17:34:11+5:302020-04-12T17:34:34+5:30
या पाणी टंचाईग्रस्त गांवपाड्यांमधील पाणी समस्या दूर करण्यासाठी यंदा 12 कोटी 62 लाखाचा टंचाई आराखडा मंजूर झालेला आहे.
ठाणे : कोविड१९ च्या पार्श्वभूमीवर सध्याच्या पाणी टंचाईच्या कामांसाठी आता ग्रामसभेच्या ठरावाची अट शिथिल करण्याचे आदेश ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ( सीईओ ) हिरालाल सोनवणे यांनी दिले आहे. शहापूर तालुक्यांमधील १९ गावे आणि ७७ पाड्यांवर सध्या 24 टँकरने पाणी पुरवठा करुन टंचाईवर मात केली जात आहे.
शहापूर तालुक्यातील १९ गावे आणि ७७ पाड्यांवर म्हणजे एकूण ९६ गाव-पाड्यांवर खाजगी स्वरूपात ट्रॅकरने पाणी पुरवठा सुरू आहे. या गाववाड्यांची साधारण ३० हजार ४९९ एवढी लोकसंख्या असून यासाठी दररोज २४ टँकरचा वापर केला जात आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता एच. एल. भस्मे यांनी दिली. सध्यस्थितीत कोरोना विषाणूच्या साथीमुळे संचारबंदीचे पालन करणे तसेच वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी होऊ नये याची दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई घोषित करण्यासाठी ग्रामसभेच्या ठरावाची अट चालू टंचाई कालावधीत शिथिल करण्यात आली आहे.
या पाणी टंचाईग्रस्त गांवपाड्यांमधील पाणी समस्या दूर करण्यासाठी यंदा 12 कोटी 62 लाखाचा टंचाई आराखडा मंजूर झालेला आहे. या टंचाई आराखड्यातून टँकरने पाणी पुरवठा करणे, नवीन विंधन विहीर घेणे, नळ पाणी पुरवठा दुरुस्ती करणे, विंधन विहिरींची दुरुस्ती करणे आदी कामे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून युद्धपातळीवर हाती घेणे आवश्यक आहे. तरच यंदाच्या या उन्हाळ्यात ग्रामस्थांना सुरळीत व आवश्यक पाणी पुरवठा होणे शक्य आहे. या कामांसाठी आता ग्राम सभेच्या ठरावाची अट शिथिल करण्यात आली आहे.