Coronavirus: २४ हजार कामगारांना घरी जाण्याची ओढ; जिल्ह्यात १६३ निवारा केंद्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 02:17 AM2020-05-06T02:17:36+5:302020-05-06T02:17:51+5:30
२,३१५ मजूर रेल्वेने रवाना, गावी जाण्यासाठी सर्वांच्या विनवण्या
सुरेश लोखंडे
ठाणे : लॉकडाउनमुळे जिल्ह्यात १६३ निवारा केंद्र सुरू असून त्यात २४ हजार २९२ मजूर, कामगार, दिव्यांग नागरिक, निराधार व्यक्तींना आश्रय दिलेला आहे. आता सरकारच्या नव्या आदेशामुळे तब्बल एक ते दीड महिन्यांपासून वास्तव्याला असलेल्या या लोकांना घरी जाण्याची ओढ लागली आहे.
सरकारच्या आदेशानुसार भिवंडी शहर व पसिरातील दोन हजार ३१५ कामगार, मजूर रेल्वेने त्यांच्या युपी, बिहारमधील गावी गेले आहेत. त्यांच्यासाठी खास रेल्वे सोडण्यात आल्या आहेत. याशिवाय त्या आणखी सोडाव्यात, पर्यायी व्यवस्था करावी किंंवा जाण्याची परवानगी देण्याची मागणी निवारा केंद्रातील प्रवासी, कामगार, मजुरांकडून होत आहे. जिल्हा प्रशासनाने त्यांची ठिकठिकाणच्या निवारा केंद्रात भोजन व निवास व्यवस्था केलेली आहे. सेवाभावी संस्थांकडूनदेखील ठिकठिकाणी भोजन, निवास व्यवस्था केली जात आहे. जिल्हा परिषदेने व मुरबाड नगरपंचायतीने पाच ठिकाणी निवारा केंद्रात १४६ जणांची सोय केली आहे. तर शहापूरमध्ये दोन ठिकाणी ७८ जणांची सोय केली आहे.
कसारा येथेही दोन क्वारंटाइन सेंटर असून आहेत. शिरोळ आश्रमशाळेत ४६ जण व खर्डी ते कसारा घाटापर्यंत पायी जाणाऱ्या प्रवाशांना ४५ दिवसांपासून आपत्ती व्यवस्थापन हॉट्सअॅप ग्रुप दररोज एक हजार लोकांना जेवण देत आहे. या व्यक्ती गोंदिया, चंद्रपूरसह राज्यातील त्यांच्या गावी जाण्यासाठी रोज विनंती करीत आहेत.
कल्याणच्या ग्रामीण भागात बदलापूरच्या बीएसयूपीच्या इमारतीत २० बेडचा क्वारंटाइन कक्ष आहे. तेथे १५ जण होते. भिवंडी बायपासच्या टाटा आमंत्रामध्ये ६५ जणांना विलगीकरण कक्षात ठेवले होते.
या संचारबंदीत म्हारळगांव, वरप, कांबा परिसरात 1600 मजुरांना ग्रामपंचायतींनी अन्नधान्य वाटप केले. या मजुरांना गावी जाण्यासाठी म्हारळ येथे मंगळवारी 355 तर कांब्याला ४२७ आणि वरपला मजुरांना वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात आले.
सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्तीच्या सहकार्याने जिल्ह्यातील या निवारा केंद्रांना फूड पाकीट पुरवठा व भोजन व्यवस्था सुरू आहे. याशिवाय शासनाची शिवभोजन थाळी या अडकलेल्या व्यक्तींना पुरवण्यात येत आहे. जिल्ह्यातील या सर्व निवारा केंद्रांवर जिल्हाधिकारी लक्ष ठेवून संबंधितांकडून दैनंदिन आढावा घेत आहेत.