Coronavirus: ठाणे जिल्ह्यातील ३१५ कोटींच्या विकासकामांना लागणार कात्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 01:52 AM2020-06-28T01:52:12+5:302020-06-28T01:52:21+5:30
कोरोनाशी दोन हात करताना विकासकामे विसरा । जेमतेम १५५ कोटी रुपये मिळणार
सुरेश लोखंडे
ठाणे : कोरोनामुळे जिल्ह्याच्या ४७० कोटींच्या विकास आराखड्यापैकी ३१५ कोटी विकास निधीत कपात करण्यात आली आहे. ही कपात ६७ टक्के इतकी असून एकूण मंजूर निधीपैकी केवळ ३३ टक्के म्हणजे १५५ कोटी रुपयेच यंदा विकासकामांवर खर्च होणार आहेत.
उपलब्ध निधीपैकी १५ कोटी ४७ लाख रुपये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अलीकडेच प्राप्त झाले आहेत. उर्वरित अवघे १४० कोटी रुपये ठाण्यासारख्या मोठ्या जिल्ह्यातील विकासकामांवर खर्च करण्यास उपलब्ध होणार आहेत.
यंदा जिल्ह्याचा विकास आराखडा ४७० कोटी रुपयांचा होता. पण, कोरोनाच्या महामारीने तो पुरता कोलमडला आहे.
राज्य शासनाने विकास आराखड्यातील मंजूर रकमेत ६७ टक्के कपात जाहीर केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासह विकासकामांची जुनी रखडलेली देणी देण्यात उपलब्ध रक्कम खर्च होणार असल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंडारे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
२०२०-२१ या आर्थिक वर्षात कपातीनंतर उपलब्ध होणाऱ्या १५५ कोटी रुपयांतून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तब्बल ९८ कोटी रुपये खर्च होण्याची अपेक्षा आहे. यंदा जिल्ह्यातील सर्वसाधारण विभागाच्या विकासकामांसाठी ३९५ कोटी तर आदिवासी उपयोजनांसाठी ७५ कोटी खर्च करण्याचे नियोजित करण्यात आले होते. पण, आता कपातीमुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे, ग्रामपंचायतींच्या जनसुविधांची कामे, मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधा, विशेष अनुदान, ऊर्जाविकास, जिल्हा रस्ते, ग्रामीण रस्त्यांचे मजबुतीकरण आणि साकवांची बांधकामे आदी कामे. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांचे बांधकाम, आरोग्य विभागाचे बांधकाम, औषध सामग्री खरेदी अशा विविध कामांवर विपरित परिणाम होणार आहे. त्यामुळे विकासाला खीळ बसणार आहे.
भिवंडी, उल्हासनगर महापालिकांना दिला निधी
जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या १० टक्के निधीतून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास प्राधान्य दिले आहे. त्यातून भिवंडी-निजामपूर महापालिकेस एक कोटी २५ लाख तर, उल्हासनगर महापालिकेस एक कोटी ३० लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ठाणे सिव्हिल रुग्णालयास १३ कोटी देण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.