CoronaVirus : पर्यटनासाठी गेलेले ३४ भारतीय इंडोनेशियात बाली येथे अडकले, विमानसेवा रद्द झाल्याने उद्भवली समस्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 02:12 AM2020-03-27T02:12:47+5:302020-03-27T05:42:53+5:30
CoronaVirus : या पर्यटकांत नाहुर येथील दिनेश आणि किशोरी कडवे दाम्पत्याचा समावेश आहे. दिनेश पानसरे ‘लोकमत’ला माहिती देताना म्हणाले की, १३ मार्च रोजी ते आठवडाभरासाठी बाली येथे गेले होते.
- अनिकेत घमंडी
डोंबिवली: भारतातून इंडोनेशिया, बाली येथे गेलेले ३४ पर्यटक कोरोनामुळे विमानसेवा बंद झाल्याने तेथेच अडकून पडले आहेत. ते सगळे पर्यटक सुखरूप असून त्यापैकी कोणीही आजारी नसले तरी भारतात परतायचे कसे, या चिंतेने ते हवालदिल झाले आहेत.
या पर्यटकांत नाहुर येथील दिनेश आणि किशोरी कडवे दाम्पत्याचा समावेश आहे. दिनेश पानसरे ‘लोकमत’ला माहिती देताना म्हणाले की, १३ मार्च रोजी ते आठवडाभरासाठी बाली येथे गेले होते. मुंबईप्रमाणेच जयपूर, राजस्थान, मोहाली, चेन्नई, केरळ, पंजाब, पुणे, दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू येथूनही बरेचसे पर्यटक तेथे गेले होते. त्यापैकी काही पर्यटक सध्या बाली येथे सिनीमयक भागातील हॉटेलमध्ये वास्तव्याला आहेत. नियोजनानुसार त्यांचे २० मार्चचे परतीचे तिकीट होते. ऐनवेळी त्यांना मलेशियन एअरलाइन्सचे विमान उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. वाढलेल्या मुक्कामामुळे रक्कमही संपली. आता तर १४ एप्रिलपर्यंत भारतात लॉकडाउनची स्थिती असल्याने आणखी किती दिवस बालीतच रहायचे, असा सवाल या पर्यटकांनी केला. आता परतीच्या प्रवासासाठी लागणारी रक्कम कोण देणार, हा प्रश्न त्यांच्यासमोर असून भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्याला साहाय्य करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.