CoronaVirus : कल्याण-डोंबिवलीमध्ये कोरोनाचे नवे 4 रुग्ण, संख्या पोहोचली 28 वर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 01:16 PM2020-04-05T13:16:06+5:302020-04-05T13:58:58+5:30
CoronaVirus : सदर चारही कोरोना बाधित रुग्ण कस्तुरबा रुग्णालय, मुंबई येथे उपचार घेत आहेत.
कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे ४ नवीन रूग्ण आढळून आले आहेत. यामुळे महापालिका क्षेत्रात कोरोना बाधित रूग्णांची संख्या आतापर्यंत २८ (निळजे प्राथमिक आरोग्य केंद्रातील ०१ रूग्णासह) झाली आहे.
नवीन रूग्णांपैकी ०१ महिला डोंबिवली पूर्व भागातील आहे. तापाची लक्षणे जाणवल्यामुळे या महिलेला खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. इतर २ महिला रुग्णापैकी (वय अनुक्रमे ७५ वर्षे व ७ वर्षे ) या देखील डोंबिवली पूर्व भागातील असून त्या कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याचे सांगण्यात येत आहे.
चौथी महिला रुग्ण डोंबिवली पश्चिम येथीलअसून ( वय २४ वर्षे) सदर महिला पॅरिस येथून परत आली होती. सदर चारही कोरोना बाधित रुग्ण कस्तुरबा रुग्णालय, मुंबई येथे उपचार घेत आहेत.
कोरोना रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणी कंटेंटमेंट प्लॅनप्रमाणे महापालिकेचे १५४ आरोग्य पथकामार्फत १४ दिवस सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सर्व रुग्णांच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात येत आहे.