coronavirus: ठाणे शहरामध्ये रेल्वेने आले परराज्यातून ४४८ कोरोनाचे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2020 11:45 PM2020-12-05T23:45:07+5:302020-12-05T23:46:16+5:30
coronavirus News : परराज्यातून रेल्वेने येणाऱ्या नागरिकांवर देखरेख आणि त्यांची रेल्वेस्थानकातच चाचणी करण्याच्या दृष्टीने ३० ऑगस्टपासून दिवसा व ५ नोव्हेंबरपासून रात्रीची चाचणी सुरू केली आहे.
-अजित मांडके
ठाणे : कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी ठाणे मनपाने चाचण्यांची संख्या वाढविली आहे. परराज्यातून रेल्वेने येणाऱ्या नागरिकांवर देखरेख आणि त्यांची रेल्वेस्थानकातच चाचणी करण्याच्या दृष्टीने ३० ऑगस्टपासून दिवसा व ५ नोव्हेंबरपासून रात्रीची चाचणी सुरू केली आहे. यानुसार आतापर्यंत ठाण्यात रेल्वेने परराज्यातून ४४८ कोरोना रुग्ण आले आहेत.
मनपा आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये रात्रीची चाचणी सुरू केली असून आतापर्यंत येथे १० हजार ९०२ जणांची चाचणी केली आहे. त्यातील ६२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दिवसाच्या सत्रात ३० ऑगस्टपासून ८९ हजार ५४ जणांची चाचणी केली असून त्यातील ३८६ जणांना लागण झाली आहे. ३ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सत्रात २९१ नागरिक आले होते. त्यातील एकाला कोरोनाची लागण झाली. तर याच दिवशी दिवसाच्या सत्रात ८१० पैकी २ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
बसमधून येणाऱ्या प्रवाशांचे काय?
राज्यातील विविध भागांतून प्रवासी बसने दररोज ठाण्यात येत आहेत. त्यात ठाणे स्टेशन, वंदना एसटी डेपो, खोपट डेपो येथे ते येतात. यातून रोज शेकडो प्रवासी ये-जा करीत आहेत. परंतु, बाहेरून येणाऱ्या एकाही प्रवाशाची चाचणी होत नाही. त्यामुळे एसटीतून किती रुग्ण ठाण्यात आले, याची माहिती मनपाकडे नाही.
दिवाळीनंतर रूग्णांच्या संख्येत वाढ
दिवाळीनंतर शहरात रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. परंतु, याच कालावधीत परराज्यातून रेल्वेने ठाण्यात २० हजार ७७२ प्रवासी आले असून त्यातील १३० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. त्यातही या प्रवाशांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या भागातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे.