Coronavirus: ठाणे जिल्ह्यात एकाच दिवसात सापडले कोरोनाचे ४९ रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 11:17 PM2022-05-25T23:17:17+5:302022-05-25T23:17:45+5:30
Coronavirus In Thane: ठाणे जिल्ह्यात बुधवारी ४९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. ठाणे शहरात सर्वाधिक २४, तर नवी मुंबई शहरात २० रुग्ण आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे - जिल्ह्यात बुधवारी ४९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. ठाणे शहरात सर्वाधिक २४, तर नवी मुंबई शहरात २० रुग्ण आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली. सकारात्मक बाब म्हणजे जिल्ह्यात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. शहरी भागात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने चिंता व्यक्त हाेत आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १९३ सक्रिय रुग्ण असून आतापर्यंत सात लाख नऊ हजार ६६६ जणांना याची लागण झाली आहे. तर, सहा लाख ९७ हजार ५०५ इतके रुग्णांनी आतापर्यंत काेराेनावर मात केली असून ११ हजार ८९५ जणांचा यात मृत्यू झाला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात सर्वाधिक २४ रुग्णांची नोंद बुधवारी झाली. जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या १०७ वर पोहोचली आहे. दुसऱ्या क्रमांकावर नवी मुंबई असून या ठिकाणी २० नवे बाधित रुग्ण आढळले आहेत. तर, मीरा-भाईंदर परिसरात पाच नवीन रुग्ण आढळले असून, या ठिकाणी सक्रिय रुग्णांची संख्या आठ आहे. मात्र, कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. मात्र येथे सक्रिय रुग्णांची संख्या सात आहे. उल्हासनगर आणि भिवंडी या महापालिका तसेच अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकांसह ठाणे ग्रामीण भागात एकही नवीन रुग्ण आढळलेला नसल्याने समाधान व्यक्त हाेत आहे.