CoronaVirus: मीरा भाईंदरमध्ये एकाच दिवसात ७ रुग्ण वाढले; एकूण कोरोना बाधितांची संख्या १५वर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 07:20 PM2020-04-05T19:20:48+5:302020-04-05T19:58:54+5:30
शहरातील नागरिकांनी अजूनही गांभीर्याने घेत घरा बाहेर निघणे बंद केले नाही, तर परिस्थिती बिकट होण्याचा धोका निर्माण झाला आहे, असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
मीरारोड - मीरा भाईंदरमध्ये एकाच दिवसात कोरोनाचे तब्बल ७ रुग्ण वाढल्याने खळबळ उडाली आहे. भाईंदरमध्ये काल कोरोना झालेल्या महिलेचा पती, मुलगा, सून व ३ वर्षांची नात हे देखील कोरोना बधीत झालेली आहे. अजुनही तब्बल ३२ जणांचे कोरोना चाचणी अहवाल यायचे आहेत. कोरोना रुग्णांची संख्या १५ झाली असुन पालिका आयुक्त चंद्रखांत डांगे यांनी पोलीस, पालिका अधिकारायांची तातडीची बैठक सायंकाळी बोलावली. शहरातील नागरिकांनी अजुनही गांभीर्याने घेत घरा बाहेर निघणे बंद केले नाही तर परिस्थीती बिकट होण्याचा धोका निर्माण झाला आहे असे वैद्यकिय सुत्रांनी सांगीतले.
शनिवार पर्यंत शहरात ८ कोरोनाचे रुग्ण आढळले होते. अवघ्या २४ तासात त्यात ७ रुग्णांची भर पडली आहे. पालिकेच्या भार्इंदर येथील जोशी रुग्णालयात ९ कोरोना रुग्णांसह एकुण ३२ जणांना दाखल केलेले आहे. तर कस्तुरबा मध्ये ३, कोकीळाबेन मध्ये २ व सेव्हन हिल्स मध्ये १ रुग्ण दाखल आहे. अजुन ३२ जणांचे कोरोनाचे चाचणी अहवाल आलेले नाहित. आता पर्यंत पडताळणी झालेले ८२५ लोकं असुन ५२० जणं पालिकेच्या वैद्यकिय विभागाच्या देखरेखी खाली आहेत.
कानुगो इस्टेट मध्ये एकाच कुटुंबाती ५ रुग्ण आढळल्यावर मीरारोडच्या मेडतीया नगर मध्ये एक रुग्ण सापडला होता. मेडतीया नगर मध्ये सापडलेला रुग्ण ज्या इमारतीत राहतो त्याच इमारतीच्या रखवालदारास कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी भार्इंदरच्या नारायण नगर व एसव्ही मार्ग येथील दोन महिलांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. नारायण नगर मधील महिलेचा आता पती, मुलगा, सून व ३ वर्षाची नात यांना सुध्दा कोरोनाची लागण झाल्याचे आज आढळुन आल्याने एकाच घरात ५ जणांना कोरोना झाला आहे.
मीरारोडच्या आरएनए ब्रॉड वे एव्हेन्यु मध्ये महिलेला कोरोनाची लागण झाली असुन ती कानुगो इस्टेट भागात तीच्या माहेरी आई कडे येत जात होती. कानुगो भागातच पहिले ५ रुग्ण सापडले होते. सदर महिलेच्या सासरचे तसेच माहेरच्या लोकांना सुध्दा जोशी रुग्णालयात दाखल केले आहे. मीरारोडच्या नित्यानंद नगर भागात कोरोनाची लागण झालेला रुग्ण सापडला असुन तो टॅक्सी चालक आहे. राजवाडी मध्ये कोरोना झाल्याने दाखल त्याच्या टॅक्सी चालक मित्राच्या तो संपर्कात आला होता.