coronavirus: मुंब्य्राभोवती कोरोनाचा विळखा आणखी घट्ट, चार दिवसांत ५२ रुग्ण, बेफिकीर वृत्ती कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 02:21 AM2020-05-14T02:21:29+5:302020-05-14T02:21:45+5:30
गेल्या चार दिवसांत आढळलेल्या रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण कोरोनाबाधितांच्या कुटुंबातील आहेत. मंगळवारी येथील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १२९ वर पोहोचली होती. यातील पाच जणांचा मृत्यू झाला असून, ३६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
- कुमार बडदे
मुंब्रा : ठामपाच्या इतर काही प्रभाग समित्यांप्रमाणे मुंब्रा प्रभाग समितीमध्येही कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. मागील चार दिवसांमध्ये येथील विविध भागांत कोरोनाचे ५२ नवीन रुग्ण आढळल्याने प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे.
गेल्या चार दिवसांत आढळलेल्या रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण कोरोनाबाधितांच्या कुटुंबातील आहेत. मंगळवारी येथील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १२९ वर पोहोचली होती. यातील पाच जणांचा मृत्यू झाला असून, ३६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ८८ जणांवर उपचार सुरु आहेत. येथे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच येथील नागरिकांची बेफिकीर वृत्ती कमी झालेली नाही. रुग्ण वाढू नयेत, यासाठी ठामपा तसेच पोलीस प्रशासन प्रयत्न करत आहे. परंतु, बहुतांश भागातील नागरिक आम्हाला कोरोनाची लागण होऊच शकत नसल्याच्या आविर्भावात बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. काही ठिकाणी नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. त्यांना अटकाव करण्याचा पोलीस त्यांच्यापरीने प्रयत्न करत आहेत.
पोलिसांचे आवाहन
कोरोनाचा सामुदायिक प्रसार होऊ नये, यासाठी गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. नागरिकांनीही भान ठेवून घराबाहेर न पडण्याचा निश्चय करून स्वत:चा तसेच त्यांच्या कुटुंबाचा बचाव करावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी केले.