coronavirus: डोंबिवली एमआयडीसीतील ६० कारखाने झाले सुरू, कच्च्या मालाची वानवा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 03:16 AM2020-05-16T03:16:18+5:302020-05-16T03:16:34+5:30

डोंबिवलीत औषध, रासायनिक, इंजिनिअरिंग आणि टेक्सटाइल या प्रकारातील जवळपास ४२० कारखाने आहेत.

coronavirus: 60 factories started in Dombivali MIDC | coronavirus: डोंबिवली एमआयडीसीतील ६० कारखाने झाले सुरू, कच्च्या मालाची वानवा

coronavirus: डोंबिवली एमआयडीसीतील ६० कारखाने झाले सुरू, कच्च्या मालाची वानवा

Next

- मुरलीधर भवार
डोंबिवली : तब्बल ४४ दिवसांच्या लॉकडाउननंतर डोंबिवली एमआयडीसीतील ६० कारखाने काही अटी-शर्तींच्या अधीन राहून सुरू झाले आहेत. मात्र या कारखान्यांना कच्चा माल मिळत नसल्याने कारखाने सुरू होऊनही उत्पादनाला हवी तशी गती मिळालेली नाही. त्यात कंत्राटी परप्रांतीय कामगार गावी गेल्याने डोंबिवलीतील कारखानदारांना उत्पादन सुरु करताना अडथळे येत आहेत.

डोंबिवलीत औषध, रासायनिक, इंजिनिअरिंग आणि टेक्सटाइल या प्रकारातील जवळपास ४२० कारखाने आहेत. लॉकडाउन लागू होण्यापूर्वीच प्रदूषण करणाऱ्या ५० पेक्षा जास्त कारखान्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने २५ लाख ते एक कोटी रुपयांपर्यंत दंड ठोठावला होता. या कारवाईच्या निषेधार्थ लॉकडाउन होण्यापूर्वीच सर्व कारखानदारांनी उत्पादन बंद आंदोलन सुरू केले होते. मात्र कोरानामुळे आंदोलन मागे घेण्यात आले होते. त्यानंतर २४ मार्चला देशात लॉकडाउन लागू झाला. ४४ दिवसानंतर काही अटी शर्तीच्या आधारे कारखाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. ४२० कारखान्यांपैकी केवळ ६० कारखाने सुरु झाले. परंतु कारखानदारांना कच्चा माल नियमित मिळत नाही. त्यामुळे कारखाना सुरु होऊनही उत्पादन घेता येत नाही.
टेक्सटाइल कारखान्यांमध्ये बहुतांश कंत्राटी कामगार असून त्यात परप्रांतीय कामगारांची संख्या जास्त आहे. लॉकडाउनच्या काळात रोजगार नसल्याने उपासमारीला कंटाळून परप्रांतीय कामगार गावी निघून गेले. त्यामुळे टेक्सटाइल कारखान्यांमध्ये कामगारांची वानवा आहे, अशी माहिती ‘कामा’ संघटनेचे पदाधिकारी श्रीकांत जोशी यांनी दिली.

कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून कारखाने सुरु करण्यास परवानगी दिली आहे. सरकारने कारखानदारांवर सर्व जबाबदारी टाकली आहे. लघु उद्योगजकांना सरकारने काही पॅकेज जाहीर केले तरच ते तग धरू शकतील.
सरकारने उद्योजकांना वाºयावर सोडले आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने अन्य उद्योजक उद्योग सुरू करणार की नाही, याविषयी साशंकता व्यक्त होत आहे.

ट्रान्सपोर्ट कंपन्यांनी त्यांचे काम सुरु केलेले नाही. लॉकडाउनमुळे नाशिक व पुण्याहून येणारा कच्चा माल येत नाही. त्यात लोडिंग कामगार हे परगावी गेल्याने पंचाईत झाली आहे. कारखानदार टप्प्याटप्प्याने कारखाने सुरू करणार आहे. सध्या ६० कारखाने सुरू झाले आहेत. बाजारात खेळत्या भांडवलाची टंचाई आहे. त्यामुळे पगार कसा करायचा, कच्चा माल कधी उपलब्ध होणार, उत्पादन तयार केल्यास त्याला उठाव मिळणार की नाही, या विवंचनेत कारखानदार आहेत.
- देवेन सोनी, अध्यक्ष, कामा संघटना

Web Title: coronavirus: 60 factories started in Dombivali MIDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.