Coronavirus : कोरोनाग्रस्त देशातून ८७ जण परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 12:39 AM2020-03-19T00:39:27+5:302020-03-19T00:40:05+5:30
आयुक्तांनी पत्रकार परिषदेसाठी महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांना येण्याची विनंती केली होती. पण महापौर स्वत:च्या दालनात असूनही आल्या नाहीत.
मीरा रोड : मीरा भाईंदरमध्ये कोरोनाग्रस्त देशातून आलेल्यांची संख्या ८७ झाली आहे. दोघा संशयितांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले असून ६० जणांना त्यांच्या घरीच ठेवले आहे. तर २५ जणांना घरी सोडल्याची माहिती आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी बुधवारी दिली.
दरम्यान, आयुक्तांनी पत्रकार परिषदेसाठी महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांना येण्याची विनंती केली होती. पण महापौर स्वत:च्या दालनात असूनही आल्या नाहीत. आमदार गीता जैन आल्या असल्याने तुम्ही आल्या नाहीत असा थेट सवाल महापौरांना केला असता त्यांनी आमदार आल्या असल्याचे प्रशासनानेच आपल्याला कळवले नाही. अन्यथा मी गेले असते असे उत्तर दिले. नंतर मात्र मी महापौर असल्याने आयुक्तांनी पत्रकार परिषद स्थायी समितीच्या सभागृहात घ्यायची होती असे कारणही सांगितले.
मीरा रोड भागात राहणाऱ्या एका कॅब चालकास कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने बुधवारी त्याला कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. हा चालक मीरा रोड भागात राहणारा असून तो दिल्ली येथे कोरानाची लागण झालेल्या एका रुग्णाच्या संपर्कात आला होता.
कॅब चालकात कोरोनाची लक्षणे दिसल्याने पालिकेच्या वैद्यकीय विभागाने त्याला कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले.
राहत्या घरातून हाकलले
दुबईहून सोमवारी रात्री भार्इंदरच्या राई शिवनेरी नगर येथील आपल्या घरी परतलेल्या ३७ वर्षीय व्यक्तीस अन्य रहिवाशांनी हुसकावून लावल्याचा प्रकार मंगळवारी घडला. ही व्यक्ती दुबईहून आली असली तरी त्याला कोरोनाची लागण झालेली नव्हती. परंतु भीतीपोटी रहिवाशांनी भाड्याने राहणाºया त्या व्यक्तीचे सामान घराबाहेर फेकले. ही व्यक्ती मुरुड येथील गावाला निघून गेला आहे.