Coronavirus: भिवंडीतील ९0 वर्षीय आजीबाईंची कोरोनावर मात; एकाच दिवशी १६ रुग्णांना सुट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 02:37 AM2020-05-06T02:37:04+5:302020-05-06T02:37:22+5:30
बदलापूरची दोन कुटुंबेही झाली बरी
ठाणे : सहा महिन्यांच्या चिमुरड्यापाठोपाठ भिवंडीतील ९0 वर्षीय वृद्धेनेही कोरोनावर मात केली आहे. याशिवाय बदलापुरातील दहा जणांच्या दोन कुटुंबांसह एकूण १६ रुग्ण मंगळवारी कोरोनावर विजय मिळवून घरी परतले आहेत. ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातून घरी जाताना रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना टाळ्या वाजवून शुभेच्छा दिल्या. वयाच्या नव्वदीत कोरोनाला पराभूत करणारी भिवंडीची महिला वयोवृद्ध रुग्णांमध्ये पहिली ठरली आहे.
ठाणे जिल्हा रुग्णालयात एक ते दीड महिन्यांपासून कोरोनाच्या रुग्णांवर ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रसाद भंडारी आणि इतर डॉक्टरांचे पथक उपचार करत आहेत. उपचाराला प्रतिसाद देत शनिवारी नऊ रुग्ण घरी परतले. यामध्ये सहा महिन्यांच्या चिमुरड्याचाही समावेश होता. आता कोरोनाला हरवून मंगळवारी आणखी १६ जण घरी परतले. यामध्ये बदलापुरातील दोन कुटुंबांतील दहा जण असून सहा जण १0 वर्षांखालील मुले आहेत. त्याचबरोबर वसई-विरार येथील दोघे, एक ठामपा कर्मचारी आणि भिवंडीतील तिघे जण असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
आजीबार्इंनी केले समाधान व्यक्त
भिवंडीच्या आजीबार्इंना त्यांच्या मुलांमुळे संसर्ग झाला होता. त्यांना त्यांच्या दोन मुलांसह ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात २२ एप्रिलला दाखल केले होते. उपचारानंतर आजीबार्इंची टेस्ट निगेटिव्ह आली; मात्र मुलांची टेस्ट अद्यापही निगेटिव्ह आलेली नाही. त्यामुळे आजीबार्इंना घरी सोडले असून मुले अद्याप उपचार घेत आहेत. आजीबार्इंनी रुग्णालयातील व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले.
पॉझिटिव्ह आईसोबत राहून तान्हुली निगेटिव्हच
बदलापूर येथील दोन कुटुंबांतील दहा जण पॉझिटिव्ह असल्याने उपचारार्थ दाखल झाले होते. त्यांची मुले १0 वर्र्षांखालील होती. एका कुटुंबातील सहा महिन्यांची तान्हुली निगेटिव्ह, तर तिची आई पॉझिटिव्ह होती. मात्र, तान्हुली शेवटपर्यंत निगेटिव्ह होती. कोरोनाच्या तीन टेस्ट केल्यानंतर तिचे अहवाल निगेटिव्हच आले. दोन्ही कुटुंबे मंगळवारी घरी परतल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.