Coronavirus : भिवंडी कॉरंटाईन कक्षातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 09:33 PM2020-04-09T21:33:39+5:302020-04-09T21:49:31+5:30

Coronavirus : ठाणे,  कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर व भिवंडी या चारही शहरातील नागरिकांसाठी नियोजित केलेले कॉरंटाईन केंद्र हे भिवंडीत असल्याने या ठिकाणी विशेष सेवा सुविधा पुरविणे प्रशासनाचे आद्य कर्तव्य आहे.

Coronavirus Administration ignores security of employees of Bhiwandi quarantine room SSS | Coronavirus : भिवंडी कॉरंटाईन कक्षातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष 

Coronavirus : भिवंडी कॉरंटाईन कक्षातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष 

Next

नितिन पंडीत

भिवंडी - देशासह राज्यात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र या उपाययोजना तोकड्या पडत असल्याचे चित्र सध्या भिवंडीत दिसत आहे. मुंबईसह राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांनाचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. दरम्यान कामगार नगरी व संवेदनशील शहर म्हणून ओळख असलेल्या भिवंडी शहरात सध्यातरी कोरोनाबाधित रुग्ण आढळला नसल्याने भिवंडीकरांचे नशीब बलवत्तर आहेत. ठाणे,  कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर व भिवंडी या चारही शहरातील नागरिकांसाठी नियोजित केलेले कॉरंटाईन केंद्र हे भिवंडीत असल्याने या ठिकाणी विशेष सेवा सुविधा पुरविणे प्रशासनाचे आद्य कर्तव्य आहे. कारण याठिकाणी चारही शहरातील कॉरंटाईन नागरिक येथे ठेवण्यात आले आहेत. कॉरंटाईन केंद्रात काम करणाऱ्या कर्माचाऱ्यांकडे प्रशासनाचे पुरता दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे येथील कर्मचारी प्रचंड मानसिक तणावात आपले कर्तव्य बजावत आहेत. या कर्मचाऱ्यांना सॅनिटायजरसह अत्यावश्यक असलेले मास्क व हँडग्लोजचा पुरवठा होत नसून या कॉरंटाईन केंद्रात औषध फवारणी व स्वच्छतेचा अभाव असल्याची खळबळजनक बाब देखील समोर आली आहे.

भिवंडी मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर या कॉरंटाईन केंद्राची सर्व जबाबदारी सोपविण्यात आली असून कॉरंटाईन केलेल्या नागरिकांच्या खोल्यांच्या सफाईसह त्यांच्या चादरी बद्दलण्यापासून ते त्यांचे वापरलेले कपडे उचलण्यापर्यंतची सर्व कामे भिवंडी मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांना करावी लागत आहेत. मात्र या कर्मचाऱ्यांना सॅनिटायजर , हँडग्लोजपासून तर साधे हात धुण्याच्या साबणाची सोय या कॉरंटाईन कक्षात नसल्याने शहरासाठी मोठी धोक्याची घंटा निर्माण झाली आहे. सुविधांअभावी हे कर्मचारी जीवावर उदार होऊन आपले कर्तव्य बजावत आहे. मात्र प्रशासन अशा अतीसंवेदनशील ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचार्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

भिवंडीतील मुंबई नाशिक महामार्गावर रांजनोली नाक्यावर असलेल्या टाटा आमंत्रण इमारतीच्या गृहसंकल्पात शासनाच्या अधिपत्याखाली असलेल्या इमारतींमध्ये सध्या कॉरंटाईन केंद्र उभारण्यात आले आहे. ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी या चार महापालिकांच्या कार्यकक्षेतील कोरोना संदर्भातील कॉरंटाईन नागरिकांना या इमारतींमध्ये कॉरंटाईन करण्यात आले आहे. या इमारतीत भिवंडीतील 40, कल्याण डोंबिवलीतील सुमारे 50 ते 60 व उल्हासनगरातील सात ते आठ नागरिकांना या ठिकाणी कॉरंटाईन करण्यात आले आहे. कॉरंटाईन केलेल्या नागरिकांसाठी सेवा पुरविण्यात येत असल्या तरी कर्मचाऱ्यांकडे शासनाचे पुरता दुर्लक्ष होत आहे. या नागरिकांवर देखरेख ठेवण्यासाठी 30 पोलीस कर्मचारी तीन ड्युटीत येथे कार्यरत असून या चारही शहरातील महानगर पालिकेचे कर्मचाऱ्यांसह भिवंडी मनपाच्या सफाईकर्मचाऱ्यांसह सुमारे 40 ते 50 कर्मचारी येथे रोज कार्यरत आहेत. मात्र या कर्मचाऱ्यांसाठी अत्यावश्यक असलेले सॅनिटायजर, मास्क, हँडग्लोजचा पुरवठा या कर्मचाऱ्यांना होत नाही. याठिकाणी काम करणारे कामगार आपल्या स्वतःसाठी या वस्तू स्वतः खरेदी करीत आहेत. तर भिवंडी मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांना कॉरंटाईन कक्षाच्या सफाईबरोबरच कॉरंटाईन केलेल्या नागरिकांची सर्व देखभाल करावी लागत आहे. या इमारतीच्या परिसरात कॉरंटाईन केलेल्या नागरिकांनी वापरलेल्या पिण्याच्या बाटल्यांचा खच सर्व इमारतीच्या आजूबाजूला पसरला आहे.

भिवंडी मनपाची कचरा उचलणारी घंटागाडी मागील चार दिवसांपासून येथे आली नाही त्यामुळे सर्वत्र कचरा व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे रोजच्या रोज या परिसराची निर्जंतुकीकरण औषध फवारणी होणे गरजेचे असूनही केवळ एकदाच या ठिकाणी औषध फवारणी करण्यात आली आहे तेव्हापासून या ठिकाणी औषध फवारणी देखील येथे करण्यात आलेली नाही. तर सफाई कर्मचाऱ्यांना हात धुण्यासाठी साध्या साबनाचीही व्यवस्था या ठिकाणी नसल्याने कर्मचारी प्रचंड मानसिक तणावात व जीवावर उदार होऊन या ठिकाणी काम करीत आहेत. एकीकडे शासन कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी शहरांमध्ये औषध फावरणीसह सर्व सेवा पुरवत आहे मात्र प्रत्येक्षात कॉरंटाईन असलेल्या अती संवेदनशील केंद्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे व कॉरंटाईन केंद्राच्या सफाई व सोयी सुविधांकडे प्रशासनाचे लक्ष जात नसल्याचे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शासनासह मनपा प्रशासनाने व राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आमच्या असुविधांकडे विशेष लक्ष द्यावे अशी मागणी आता येथे काम करणारे कर्मचारी करीत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : कोरोनापासून शेळ्यांचं रक्षण करण्यासाठी त्याने लढवली अनोखी शक्कल, पाहून वाटेल नवल

Coronavirus : कोरोनामुळे परिस्थिती गंभीर! अमेरिकेत 11 भारतीयांचा मृत्यू, 16 जणांना लागण

Coronavirus : कोरोनाचा धसका! अंत्यसंस्कारासाठी गावकऱ्यांनी दिला नकार, मृतदेह नाल्यात केला दफन

Coronavirus : रुग्णालयाचा निष्काळजीपणा! कोरोनाग्रस्तांचा रिपोर्ट निगेटिव्ह समजून दिला डिस्चार्ज अन्...

Coronavirus : धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये पत्नी माहेरी अडकल्याने पतीची आत्महत्या 

 

Web Title: Coronavirus Administration ignores security of employees of Bhiwandi quarantine room SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.