CoronaVirus: अत्यावश्यक सेवा वगळता ठाण्यात इतर सेवा पूर्ण बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 02:15 AM2020-04-21T02:15:25+5:302020-04-21T02:16:02+5:30
टोल नाक्यावर वाहनांची रांग; सरकारी आदेशातील संदिग्धतेमुळे उद्योगांचे शटर डाउन
ठाणे : ठाण्यातील आनंद नगर टोलनाक्यावर सोमवारी सकाळी वाहनांच्या काही प्रमाणात रांगा लागल्याचे चित्र दिसत होते. मात्र शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा या बंदच होत्या. ठाण्यात दिवसेंदिवस कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने व उद्योग सुरु करण्याबाबतच्या सरकारी आदेशांत संदिग्धता असल्याने काही आस्थापनांना व्यवहार सुरु करण्याची परवानगी देऊनही बहुतांश व्यवहार ठप्पच होते.
मागील २१ मार्च पासून संपूर्ण देशात लॉक डाउन करण्यात आला आहे. तो आता ३ मे पर्यंत लागू असणार आहे. २० एप्रिल पर्यंत ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असेल त्या ठिकाणचे उद्योग तसेच इतर काही व्यवहार काही प्रमाणात सुरु करता येऊ शकतील, असे सरकारच्यावतीने सांगण्यात आले होते. तसेच शासकीय कार्यालयात १० टक्के उपस्थितीला परवानगी दिली होती. परंतु ठाण्यातील कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा १५० च्या घरात गेला आहे. परिणामी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या सीमा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ठाण्यासह जिल्ह्यातील एकही उद्योगधंदा सोमवारपासून सुरु होऊ शकलेला नाही. उद्योग सुरु केल्यानंतर कामगारांना त्याच ठिकाणी ठेवण्यात यावे, अशी अट घालण्यात आली आहे. परंतु लघु उद्योगांसाठी ते शक्य नाही. उद्योग सुरु केले तरी कच्चा माल उपलब्ध होऊ शकणार नाही. त्यामुळे उद्योगधंदे सुरु करुन काय उपयोग, असा सवाल ‘टिसा’चे अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब खांबेटे यांनी केला. तसेच सरकारच्या इतर अनेक अटी जाचक आणि संदिग्ध असल्याने जिल्ह्यातील उद्योगधंदे सुरु होऊ शकलेले नाहीत, असे खांबेटे म्हणाले.
टोलनाकेसोमवारपासून सुरु झाल्याने आनंद नगर टोलनाक्यावरील दोन लेन यासाठी खुल्या करण्यात आल्या होत्या. त्याठिकाणी अवजड वाहनांच्या काही प्रमाणात रांगा लागल्या होत्या. महापालिकेतही १० टक्के कर्मचारी हजर नव्हते. कर्मचाऱ्यांचे प्रमाण तुरळक होते. शहरातील इतर भागात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंदच होत्या.
कळव्यात भाजीसाठी गर्दी
महापालिकेत १० टक्के कर्मचाºयांची उपस्थिती मंजूर केलेली असली तरी त्याचा फारसा परिणाम दिसून आला नाही. ठाण्यातील दैनंदिन व्यवहारांवर कोरोनाच्या भयाचे सावट असले तरी कळव्यात मात्र रुग्ण वाढत असतांनाही नागरीकांना त्याचे भय नसल्याचे चित्र होते. रस्त्यांवर तसेच भाजी खरेदीकरिता लोकांची गर्दी दिसत होती.