CoronaVirus : अंबरनाथ 'कोरोना'मुक्त शहर, तिन्ही रुग्णांना डिस्चार्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 07:09 PM2020-04-25T19:09:59+5:302020-04-25T20:41:06+5:30
CoronaVirus : अंबरनाथ शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण हा बुवापाडा भागात सापडला होता. मात्र त्या रुग्णाचा उपचारादरम्यान 4 एप्रिल रोजी मृत्यू झाला.
अंबरनाथ : अंबरनाथ शहरात कोरोनाचे 4 रुग्ण आढळले होते. त्यातील एकाचा मृत्यू झाला होता. तर इतर 3 रुग्णांवर उपचार सुरु होते. या उपचार घेणा-या तिन्ही रुग्णांचे कोरोना टेस्ट आता निगेटिव्ह आले आहे. त्यामुळे या तिन्ही रुग्णांना रुग्णालयात सोडण्यात आले असून त्यांना होम क्वारंटाईन करण्याचे आले आहे.
अंबरनाथ शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण हा बुवापाडा भागात सापडला होता. मात्र त्या रुग्णाचा उपचारादरम्यान 4 एप्रिल रोजी मृत्यू झाला. मात्र त्याच्या संपर्कात आलेले त्याचे दोन पुतणे हे देखील कोरोनाग्रस्त झाले होते. त्यांना देखील उपचारासाठी ठाण्याच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या दोन रुग्णांवर उपचार सुरु असतांनाच मुंबईत काम करणा-या एका सुरक्षा रक्षकालाही कोरोनाची लागण झाली होती. त्याला मुंबईहुनच रुग्णालयात दाखल केले होते. त्यामुळे अंबरनाथमध्ये तीन कोरोनाग्रस्त रुग्ण उपचार घेत होते. तर त्यांच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या नातेवाईकांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्या 35 कुटुंबियांचे रिपोर्ट देखील निगेटिव्ह आले होते. तर डायलेसिस साठी गेलेल्या एका रुग्णाचा आणि त्याच्या कुटुंबियांची देखील कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्या तीघांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील सर्व 38 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह होते. त्यातच आता उपचार घेणारे तिन्ही रुग्ण देखील कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे आता अंबरनाथ शहर ते कारोना रुग्ण मुक्त शहराच्या यादीत आले आहे. या संदर्भात मुख्याधिकारी देविदास पवार आणि कारोनासाठी नेमलेले डॉ. मेजर. नितीन राठोड यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. शहर कारोना रुग्ण मुक्त झाले असले तरी शहराच्या सुरक्षेसाठी आणखी उपाययोजना आखण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शहरात नागरिक बाहेर पडणार नाही आणि जे विणाकारण फिरत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच शहरातुन बाहेर अत्यावश्यक सेवा पुरविण्यासाठी जात आहेत त्यांची माहिती घेऊन त्या कर्मचा-यांना सुरक्षित करण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहे. तसेच शहरात येणा-या प्रत्येक गाडय़ाचे निर्जतुकीकरण केले जात असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले आहे.