coronavirus: अंबरनाथसाठी निधीपेक्षा तज्ज्ञ डॉक्टरांची गरज, प्रशासनाचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 01:36 AM2020-07-11T01:36:25+5:302020-07-11T01:36:49+5:30
अंबरनाथ नगरपालिकेने कोरोनाबाधितांवर उपचारासाठी ७०० बेडचे रुग्णालय उभारले असले तरी हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी आवश्यक असलेली वैद्यकीय मदत पालिकेला मिळालेली नाही.
अंबरनाथ : अंबरनाथमध्ये दोन आठवड्यांचा लॉकडाऊन केल्यानंतरही रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर ताण पडला आहे. अशा कठीण परिस्थितीत सरकारकडून डॉक्टर आणि वैद्यकीय सहायकाची गरज आहे. ही मदत लवकरात लवकर मिळावी अशी अपेक्षा पालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे. पालिकेला निधीपेक्षा डॉक्टरांची सर्वाधिक गरज असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अंबरनाथ नगरपालिकेने कोरोनाबाधितांवर उपचारासाठी ७०० बेडचे रुग्णालय उभारले असले तरी हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी आवश्यक असलेली वैद्यकीय मदत पालिकेला मिळालेली नाही. पालिकेने कंत्राटी पद्धतीने जे डॉक्टर घेतले आहेत, त्यांच्या भरवशावर कोविड रुग्णालय सुरू ठेवले आहे. मात्र या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता भासत आहे. अशा कठीण परिस्थितीत रूग्णालयातील ताण कमी करण्यासाठी रुग्णांना तीन ते चार दिवसात घरी सोडण्यात येत आहे. रुग्णालयात रुग्णांची प्रकृती बिघडू नये त्यामुळेच पालिका प्रशासन असे निर्णय घेत आहे. राज्य सरकारमार्फत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी निधी देण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र निधीपेक्षा सरकारने तज्ज्ञ डॉक्टर आणि त्यांना मदत करणारी टीम द्यावी अशी माफक अपेक्षा पालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे.
ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रभाव कमी आहे अशा जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयातील डॉक्टर अंबरनाथमध्ये वर्ग करावे अशी सूचनाही पुढे करण्यात येत आहे. गेल्या दोन आठवड्यात कोरोनाग्रस्त आणि त्यांचे निकटवर्तीय यांना शोधण्यात आणि त्यांच्याशी संपर्कात राहण्यात पालिका प्रशासनाला यश आले आहे. त्यामुळे पालिकेच्या नियंत्रण कक्षातून रुग्णांना सतत दक्षता घेण्याचे सल्ले दिले जात आहे.
प्रशासन उपलब्ध मनुष्यबळाच्या जोरावर चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता भासत असल्याने त्यात अडचणी येत आहेत. सरकारकडे आम्ही तज्ज्ञ डॉक्टरांची मागणी केली आहे. तसेच वैद्यकीय सेवकही गरजेचे आहेत.
- डॉ. प्रशांत रसाळ, मुख्याधिकारी