Video: 'जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो'; अंबरनाथ पोलिसांनी लढवली अनोखी शक्कल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 09:31 AM2020-03-27T09:31:40+5:302020-03-27T09:41:56+5:30
अंबरनाथ शहरात चोख पोलिस बंदोबस्त आणि नाकाबंदी असतानादेखील अनेक नागरिक काही ना काही कारण सांगून घराबाहेर पडत आहेत.
अंबरनाथ: कोरोनाचा धोका ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. घराबाहेर पडू नका, तुमच्या घराच्या उंबरठ्याबाहेर एक लक्ष्मणरेषा ओढण्यात आली आहे. ती ओलांडू नका. घरातच राहावे. तुमचे घराबाहेर पडणारे एक पाऊल, काही लोकांच्या निष्काळजीपणाने, काहींच्या गैरसमजुतीने, तुम्हाला, तुमच्या मुला-बाळांना, आई-वडिलांना, तुमच्या कुटुंबाला, मित्रांना आणि पूर्ण देशाला अत्यंत कठीण स्थितीत नेईल असं पंतप्रधानांनी सांगितले आहे.
मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंध लादण्यात आलेली असताना देखील अनेक नागरिक घराबाहेर पडत आहेत. काम नसतानाही घराबाहेर पडणाऱ्या या नागरिकांना आवाहन करण्यासाठी अंबरनाथ पोलिसांनी अनोखी शक्कल लढवली आहे. 'जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो' हे गाणं गाऊन पोलिसांनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
अंबरनाथ शहरात चोख पोलिस बंदोबस्त आणि नाकाबंदी असतानादेखील अनेक नागरिक काही ना काही कारण सांगून घराबाहेर पडत आहेत. भाजी खरेदी, किराणा खरेदी, आणि औषध खरेदी च्या नावावर भटकंती करण्याचा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. अशा टवाळखोर लोकांना पोलीस सर्वत्र चोप देखील देत आहेत. मात्र अंबरनाथ पोलिसांनी सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नराळे यांच्या नेतृत्वाखाली अनोखी शक्कल लढवली आहे.
महाराष्ट्र पोलिसांची अनोखी शक्कल, गांधीगिरीनंतर अंबरनाथ पोलिसांनी बघा कसं केलं लोकांना आवाहन @DGPMaharashtra@Thane_R_Police#CoronavirusLockdownpic.twitter.com/Rv6JxcLkl7
— Lokmat (@MiLOKMAT) March 27, 2020
पोलीस खात्यात असलेले आणि चांगले गायक असलेल्या कर्मचाऱ्यांची मदत घेऊन रस्त्यावर देशभक्तीपर गीत गाऊन नागरिकांना भावनिक आवाहन करण्याचे काम केले जात आहे. केवळ फटके मारून लोक सुधारणार नाही या जाणिवेतून आता पोलिसांनी देशभक्तीपर गीतांचा आधार घेतला आहे. पोलिसांच्या या प्रयत्नांना यश देखील येत आहे. तसेच त्यांच्या या गांधीगिरी मार्गाचा अवलंब इतर पोलिसांनाही करावा अशी मागणी आता नागरिकांमधून व्यक्त होत आहे. १४ एप्रिलपर्यंत कोरोना संक्रमणाची साखळी मोडून काढायची आहे. त्यासाठी लोकांना घराबाहेर पडू नका असं सांगण्यात येत आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. आतापर्यंत राज्यात ७७० लोकांना कोरोनाची लागण झालेली आहे. तर २० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.