Coronavirus: अंबरनाथचा मृत्यूदर कमी करण्याचे प्रयत्न; रुग्णवाहिकांची संख्या वाढवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 11:53 PM2020-07-03T23:53:05+5:302020-07-03T23:53:19+5:30
कोरोना रुग्णाची प्रकृती बिघडल्यावर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी ठाण्याच्या सिव्हील रुग्णालयात पाठवावे लागत आहे.
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात ५२ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला असून एकूण रुग्णाच्या संख्येपैकी २.६९ टक्के रुग्णांचा मृत्यू होत आहे. हा दर कमी करून एक टक्क्यांवर आणण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. मृतांपैकी काही रुग्ण हे चाचणी अहवाल येण्याआधीच मरण पावले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी या भागाला भेट देऊन आढावा घेतल्यानंतर प्रशासनाची कानउघाडणी केल्यामुळे प्रशासन सक्रिय झाले आहे.
शहरातील कोरोना रुग्णांची संख्या २ हजाराच्या घरात आहे. सोबत मृत्युचे प्रमाण वाढत आहे. हा मृत्यु दर कमी करण्यासाठी प्रशासन काम करीत आहेत. वयस्कर रुग्णामध्ये लक्षणे आढळल्यास त्यांना लागलीच उपचार देण्याची यंत्रणा तयार करण्यात येत आहे. उपचारविना मृत्यू होऊ नये यासाठी प्रशासनाने संशयित रुग्णांवर उपचार करण्यासाठी छाया रुग्णालयात आॅक्सिजन वार्ड तयार करायला घेतले आहे. याच ठिकाणी अत्यंत गंभीर रुग्णांवर देखील उपचार करण्याची यंत्रणा तयार केली जात आहे. टेस्ट रिपोर्ट आल्यावर त्यांच्यावर उपचार केले जाणार आहे.
कोरोना रुग्णाची प्रकृती बिघडल्यावर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी ठाण्याच्या सिव्हील रुग्णालयात पाठवावे लागत आहे. मात्र आता पालिका स्वत: ४ वॉर्ड तयार करण्यासाठी पुढाकार घेत आहे. त्यामुळे मृत्युचे प्रमाण कमी करण्यास मदत होणार आहे. ज्या रुग्णाला ऑक्सिजनची गरज आहे त्यांच्यासाठी पोर्टेबल ऑक्सिजन व्हॅन तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जलद गतीने रुग्णाची ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिका वाढविण्यात येणार आहेत. नागरिकांची तपासणी करण्याचे काम देण्यात आले आहे.
रुग्णांचे प्राण वाचावे, यासाठी जे करणे शक्य आहे ते काम करण्यात येईल. स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला आहे. तसेच जलद गतीने तपासणी यंत्रणा तयार केली आहे. - डॉ. प्रशांत रसाळ, मुख्याधिकारी, अंबरनाथ
अनेक रुग्ण उपचार मिळत नसल्याने दगावत आहेत, हे लक्षात येताच संशयित रुग्णांसाठी उपचार यंत्रणा छाया रुग्णालयात तयार केली आहे. त्याचा लाभ रुग्णांना होईल. - जगतसिंग गिरासे, प्रशासक, अंबरनाथ पालिका