coronavirus: अंबरनाथचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 90 टक्क्यांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 06:47 PM2020-08-19T18:47:08+5:302020-08-19T18:48:19+5:30
अंबरनाथ नगरपरिषदेच्या वतीने शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा याकरिता विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत.
अंबरनाथ - करोना नियंत्रणासाठी अंबरनाथ शहरात नगर परिषदेच्या वतीने बाधितांचा वेळीच घेतलेला शोध, आग्रही चाचणी, अलगीकरण आणि विलगिकरण यंत्रणेची यशस्वी नियोजन आणि बाधित रुग्णांवर प्रभावी उपचार नियोजनामुळे अंबरनाथ शहरात रुग्ण बरे होण्याचा दर तब्बल 90 टक्क्यांवर गेला आहे. विशेष म्हणजे अंबरनाथ नगरपरिषद संचलित दंत महाविद्यालयातील कोविड रुग्ण बरे होण्याचा दर तब्बल 96 टक्क्यांवर गेला आहे. तर येथील रुग्णालयाचा मृत्यूदर अर्ध्या टक्क्याच्याही खाली आहे.
अंबरनाथ नगरपरिषदेच्या वतीने शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा याकरिता विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. शहरात आजपर्यंत एकूण 11 हजार 452 कोव्हिडं चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर शहरात एकूण 4 हजार 502 बाधित रूग्ण आढळले आहेत. शहरातील एकूण रूग्णांपैकी तब्बल 4 हजार 79 रूग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत. तर शहरात एकूण 174 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
अंबरनाथ नगरपरिषद संचालित दंत महाविद्यालयातील कोविड रुग्णालयात आजपर्यंत 2 हजार 54 रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. यातील एकूण 1 हजार 980 रुग्ण हे उपचारार्थी बरे होऊन घरी परतले आहेत. या रुग्णालयातील रुग्ण बरे होण्याचा दर हा तब्बल 96 टक्के इतका आहे. मागील दोन महिन्यात या रुग्णालयात 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण रूग्णसंख्येच्या तुलनेत हा दर अवघा 0.19 इतका आहे. यासोबतच शहरातील एकूण रूग्णांचा बरे होण्याचा दरही 90 टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र शहरातील कोरोनाचा मृत्यू दर हा अजूनही पालिकेची चिंता वाढविणारा आहे. हा मृत्यू दार कमी करण्यासाठी पालिका प्रयत्न करीत आहे.
शहरातील बाधित रूग्णांचा शोध घेण्यासाठी पालिकेने स्वतंत्र यंत्रणा उभारली आहे. त्यासोबत बाधिताच्या संपर्कातील व्यक्तींचा तातडीने शोध घेऊन त्यांची तपासणी केली जात असल्याने संसर्गाचे प्रमाण काही अंशी रोखण्यात यश येताना दिसते आहे.
- प्रशांत रसाळ, मुख्याधिकारी