Coronavirus : भाईंदरमध्ये विलगीकरण केंद्रावरून संताप, नागरिक, पोलिसांमध्ये झाला वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 02:20 AM2020-03-20T02:20:48+5:302020-03-20T02:20:58+5:30

भाईंदर पूर्वेच्या पालिका क्रीडा संकुलासमोरील स्वतंत्र इमारतीत पालिकेने सुरू केले आहे. यामुळे संतप्त लोकांनी या ठिकाणी विरोध केला व घोषणा दिल्या.

Coronavirus : Anger at the separation center in Bhayandar, dispute between citizens & police | Coronavirus : भाईंदरमध्ये विलगीकरण केंद्रावरून संताप, नागरिक, पोलिसांमध्ये झाला वाद

Coronavirus : भाईंदरमध्ये विलगीकरण केंद्रावरून संताप, नागरिक, पोलिसांमध्ये झाला वाद

Next

मीरा रोड/ भाईंदर : मीरा रोड येथील डेल्टा गार्डनजवळ विलगीकरण केंद्र सुरू करण्यास भाजप नगरसेवकांसह काही नागरिकांनी विरोध केल्याने तेथील प्रस्ताव गुंडाळत केंद्र आता भाईंदर पूर्वेच्या पालिका क्रीडा संकुलासमोरील स्वतंत्र इमारतीत पालिकेने सुरू केले आहे. यामुळे संतप्त लोकांनी या ठिकाणी विरोध केला व घोषणा दिल्या. या वेळी सामान आणणारी वाहने नागरिकांनी अडवली असता पोलिसांशी वाद झाला.
परदेशातून आलेल्या; परंतु कोरोना नसलेल्या नागरिकांना खबरदारी म्हणून १४ दिवसांसाठी विलगीकरण केंद्रात ठेवण्याची आवश्यकता आहे. मीरा- भार्इंदरमध्ये परदेशातून आलेल्या नागरिकांची संख्या १०५ झालेली आहे; परंतु शहरात पालिकेने विलगीकरण केंद्रच सुरू केले नसल्याने ते नागरिक घरातच राहत आहेत.

पालिकेने मीरा रोडच्या डेल्टा गार्डनजवळील स्वतंत्र इमारतीत विलगीकरण केंद्र सुरू करण्यासाठी पक्की केली असता भाजप नगरसेविकेसह काहींनी विरोध केला. महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांच्याकडे बैठक झाली. येथे केंद्र सुरू करण्याची तयारी प्रशासनाने केली असताना राजकीय विरोधामुळे महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी येथील प्रस्तावच रद्द केला.

भार्इंदर पूर्वेच्या इंद्रलोक - न्यू गोल्डन नेस्ट भागात क्रीडा संकुलासमोरील सोनम बिल्डर यांनी विकसित करून पालिकेस दिल्या जाणाऱ्या एमएमआरडीए योजनेतील स्वतंत्र इमारतीच्या पहिल्या मजल्यावर केंद्र सुरू करण्याचा निर्णय बुधवारी आयुक्तांनी जाहीर केला होता; परंतु याची माहिती मिळताच रात्री नागरिक जमले व त्यांनी विरोध दर्शवला. गुरुवारी सकाळीही नागरिक जमले होते. डेल्टा गार्डनजवळचे केंद्र राजकीय दबावाखाली बंद करता आणि आमच्याकडे पोलीस बंदोबस्त घेऊन सुरू करता, असा सवाल केला. येथे केंद्र सुरू होऊ देणार नाही, असा पवित्रा नागरिकांनी घेतला.
आयुक्तांना जाब विचारला असता त्यांनी, डेल्टा येथे सुविधा नव्हती व येथे सुविधा असल्याने केंद्र सुरू केल्याचे सांगत नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही, असे आश्वस्त केले. या वेळी स्थानिक नगरसेविका तारा घरत, स्नेहा पांडे, जयंतीलाल पाटील व हरिश्चंद्र आमगावकर यांनी आयुक्तांना नागरिकांच्या मनात असलेली भीती व त्यांची काळजी घेण्याची मागणी केली; परंतु आयुक्तांनी केंद्र सुरू करत असल्याचे सांगत विरोध केल्यास कारवाई करू, असा इशारा दिला.

पोलिसांविरोधात दिल्या घोषणा : केंद्रासाठी सामान आणणाºया गाड्या अडवल्या असता, पोलीस आणि नागरिकांमध्ये धक्काबुक्की झाली; परंतु पोलिसांनी विरोध मोडून काढला. पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतल्याने नागरिकांनी आमदार गीता जैन यांच्या निषेधार्थ तसेच पोलिसांच्या विरोधात घोषणा दिल्या. नागरिकांनी आपला मोर्चा जैन यांच्या कार्यालयाकडे वळवला.

Web Title: Coronavirus : Anger at the separation center in Bhayandar, dispute between citizens & police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.