coronavirus: ढिसाळ कारभाराचा ठाण्यातील आणखी एका रुग्णाला फटका, बाधिताच्या पत्नीला क्वारंटाइन केलेच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 02:07 AM2020-05-12T02:07:16+5:302020-05-12T02:07:51+5:30
कळवा रुग्णालयाच्या ढिसाळ कारभाराचा फटका लोकमान्यनगर, वागळे इस्टेट, मुंब्रा आदी भागांतील नागरिकांना बसला असतानाच आता कोरोनाबाधित रुग्णांनादेखील तो बसत आहे.
ठाणे : घोडबंदर भागातील मानपाडा गावातील बोर्डाच्या सुरक्षारक्षकाला कोरोनाची लागण होऊनदेखील त्याला एक दिवस घरी थांबण्याचा सल्ला लॅबने दिला. परंतु, दक्ष नागरिकांच्या सतर्कतेमुळे या रुग्णाला अखेर रविवारी रात्री दीडच्या सुमारास रुग्णालयात दाखल केले आहे. परंतु, तोपर्यंत त्याच्या संपर्कात आलेल्या त्याची पत्नी आणि घरातील इतर मंडळींना महापालिकेने अद्यापही क्वारंटाइन केले नसल्याची बाबही समोर आली आहे.
एकीकडे कळवा रुग्णालयाच्या ढिसाळ कारभाराचा फटका लोकमान्यनगर, वागळे इस्टेट, मुंब्रा आदी भागांतील नागरिकांना बसला असतानाच आता कोरोनाबाधित रुग्णांनादेखील तो बसत आहे. मानपाडा गावातील या सुरक्षारक्षकाला काही दिवसांपासून त्रास होत होता. त्यामुळे त्याने महापालिकेने मान्यताप्राप्त केलेल्या खाजगी लॅबकडून कोरोनाचाचणी केली. त्यानंतर, रविवारी सायंकाळी ५ च्या सुमारास त्याच्या मेलवर रिपोर्ट आला. त्यामुळे तो पॉझिटिव्ह आल्याने पुढे काय करायचे, कुठे जायचे, असा प्रश्न त्याला पडला होता. त्यामुळे रात्री ९ च्या सुमारास त्याने संबंधित लॅबला फोन केला. परंतु, सर नसल्याचे त्याला सांगण्यात आले. रात्र घरीच काढा, असाही निरोप त्याला दिला गेला. मात्र, त्याची प्रकृती जास्त खालावत जात होती. खोकला, ताप, सर्दी यामुळे तो हैराण झाला होता. त्यात असे उत्तर मिळाल्याने तो आणखीनच चक्रावून गेला. अखेर, भावाच्या आणि मित्रांच्या मदतीने महापालिकेशी संपर्क साधून रात्री दीडच्या सुमारास त्याला रुग्णालयात दाखल केले.
संपर्कात आलेल्या पत्नीलाही आता त्रास सुरू झाला असून तिलादेखील रुग्णालयात हलविण्यात यावे, अशी मागणी दक्ष नागरिकांनी महापालिकेकडे केली. परंतु, सोमवारी रात्र झाली तरी तिला घेऊन जाण्यास कोणीही आले नसल्याचे या दक्ष नागरिकांनी सांगितले. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या या चुकीचा फटका आता आणखी किती जणांना बसणार, त्यांच्या संपर्कात आणखी काही नागरिक आले असतील, तर त्यांनाही याचा त्रास सहन करावा लागणार आहे.
वास्तविक पाहता संबंधित रुग्णाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्या घरच्यांना तत्काळ क्वारंटाइन करणे अपेक्षित होते. परंतु, महापालिकेने तसे काहीच केलेले नाही. त्यामुळे कोरोना रोखण्यासाठी पालिकेची यंत्रणा काम करीत आहे का? की वाढविण्यासाठी काम करीत आहे, असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित
झाला आहे.