coronavirus: आता बाइक अॅम्ब्युलन्सवरून होणार अॅण्टीजेन टेस्टिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 02:24 AM2020-09-01T02:24:15+5:302020-09-01T02:24:34+5:30
सद्य:स्थितीत महापालिका क्षेत्रात प्रत्येक प्रभाग समितीअंतर्गत अॅण्टीजेन टेस्टिंग सेंटर्स सुरू केले आहेत.
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना कोविड-१९ च्या चाचण्यांची संख्या वाढविण्याच्या दृष्टिकोनातून महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या बाइक अॅम्ब्युलन्सचा वापर आता अॅण्टीजेन टेस्टिंगसाठी करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सोमवारी घेतला.
सद्य:स्थितीत महापालिका क्षेत्रात प्रत्येक प्रभाग समितीअंतर्गत अॅण्टीजेन टेस्टिंग सेंटर्स सुरू केले आहेत. तथापि, चाचण्यांची संख्या वाढावी, या दृष्टिकोनातून हा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. आजमितीस आरोग्य विभागाकडे एकूण १७ बाइक अॅम्ब्युलन्स उपलब्ध असून त्या प्रभाग समितीनिहाय वितरित करण्यात येणार आहेत. याबाबत वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. मुरूडकर यांना या बाइक अॅम्ब्युलन्सचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
निवासी संकुलांना प्राधान्य
या बाइक अॅम्ब्युलन्सचा विनियोग कशा पद्धतीने करण्यात येणार आहे, याचा निर्णय प्रभाग समितीस्तरावर घेण्यात येणार असून मोठी निवासी संकुले, मार्केट आदी ठिकाणी त्यांचा वापर करण्यात येणार आहे.