CoronaVirus: अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे गृहनिर्माण संस्थांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 02:02 PM2020-03-27T14:02:24+5:302020-03-27T14:02:53+5:30
संस्थेतील सभासद जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी घराबाहेर पडून अनावश्यक गर्दी टाळण्याची जबाबदारी सोपविण्यात येऊन त्यानुसार प्रत्येक गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढील प्रमाणे जबाबदारी पार पाडण्यासाठीचे आदेश देण्यात येत आहेत.
ठाणे : कोरोनाच्या निर्मूलनासाठी शासनाने 14 एप्रिलपर्यंत लॉगडाऊन घोषित केले असून, कलम 144 लागू करून संचारबंदी जाहीर केली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जनतेने घराबाहेर न पडणे, गर्दी निर्माण करणाऱ्या घटना टाळाव्यात याबाबत दक्षता घेणे आवश्यक असताना प्रत्यक्षात मात्र भाजीपाला, किराणा इ. खरेदीसाठी दुकानात गर्दी निर्माण होत आहे. यातून विषाणूला प्रतिबंध होणे शक्य नाही. तरी सदरचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रत्येक गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांवर यांच्या संस्थेतील सभासद जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी घराबाहेर पडून अनावश्यक गर्दी टाळण्याची जबाबदारी सोपविण्यात येऊन त्यानुसार प्रत्येक गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढील प्रमाणे जबाबदारी पार पाडण्यासाठीचे आदेश देण्यात येत आहेत.
संस्थेच्या गेट जवळ सॅनिटायझरर्स ठेवून प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हात स्वच्छ करूनच सोसायटीमध्ये प्रवेश द्यावा. इंटरकॉमव्दारे प्रत्येक सदस्यास आवश्यक असणाऱ्या किराणा, भाजीपाला इ. गोष्टीची मागणी गोळा करावी व त्यानुसार जवळच्या किराणा, भाजीपाला वगैरे जीवनावश्यक वस्तूची ऑर्डर ( सदस्य निहाय) देऊन सामान सोसायटीच्या गेटवरतीच मागवून घेणे. एकेका सदस्याच्या घरी सिक्युरिटीमार्फत सदरचे सामान पोहोचवावे वा प्रत्येक घरातील 1 सदस्यास बोलवून गेटवरती सदर सामानाचे वाटप करावे, मात्र हे करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. सोसायटीतील सदस्य तातडीच्या न टाळता येणाऱ्या कारणाशिवाय बाहेर जाणार नाहीत याची दक्षता संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जातीने घ्यावी. तसेच सोसायटीच्या क्लब हाऊस, बगीचा येथे सदस्य वा लहान मुले एकत्र येणार नाही याबाबत योग्य ती दक्षता वा प्रतिबंधात्मक उपाय योजावेत.