coronavirus: कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचे ऑडिट करा - म्हस्के
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 12:57 AM2020-10-30T00:57:39+5:302020-10-30T00:59:46+5:30
Thane News : ठाण्यात कोरोनासोबतच यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणदेखील बऱ्याच अंशी कमी झाल्याचे महापालिकेने दिलेल्या आकडेवारीवरून उघड झाले आहे.
ठाणे - ठाण्यात मृत्युदर नियंत्रणात येत असला तरी, आतापर्यंत झालेल्या मृत्यूंचे ऑडिट करण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला दिले आहे. कोरोनामुळे मृत झालेल्या प्रत्येक व्यक्तीचे यामध्ये ऑडिट होणार असून मयत झालेली व्यक्ती कधी ॲडमिट झाली होती. त्या व्यक्तीवर कशापद्धतीने उपचार करण्यात आले, याची सर्व माहिती या ऑडिटच्या माध्यमातून घेण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या आहेत. भविष्यात मृत्युदर आणखी कमी करण्यासाठी या सर्व माहितीचा उपयोग होणार असून यामुळे खाजगी हॉस्पिटलवरदेखील प्रशासनाचा वचक राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
ठाण्यात कोरोनासोबतच यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणदेखील बऱ्याच अंशी कमी झाल्याचे महापालिकेने दिलेल्या आकडेवारीवरून उघड झाले आहे. ठाण्यात आतापर्यंतचा सरासरी मृत्युदर हा २.४९ टक्क्यांवर आला असून ऑक्टोबर महिन्यात तर हा मृत्युदर १.०३ टक्क्यांवर आला आहे. मृत्यूचे हेच प्रमाण एप्रिल आणि मे महिन्यात पाच टक्क्यांपेक्षा जास्त होते. मात्र, आतापर्यंत जेवढे मृत्यू कोरोनामुळे झाले आहेत, त्यांचे ऑडिट करण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत.
महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांचे ऑडिट करण्यासाठी संबंधितांची समिती गठीत करून यामध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागातील व प्रशासनातील सक्षम अधिकारी, ठाणे टास्क फोर्सचे अधिकारी, संबंधित हॉस्पिटलचे प्रतिनिधी, ज्या विभागातील रुग्ण आहे त्या विभागातील स्थानिक वैद्यकीय अधिकारी व कोविड आजारातील तज्ज्ञ अधिकारी यांचा समावेश करावा असेही महापाैरांनी यावेळी
सांगितले.