Coronavirus: लॉकडाऊननंतरही अनावश्यक गर्दी टाळा!कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’चा वेबिनार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 01:08 AM2020-05-05T01:08:59+5:302020-05-05T01:09:13+5:30

सोसायटीतील प्रत्येकाने सहकार्य करावे

Coronavirus: Avoid Unnecessary Crowds Even After Lockdown! | Coronavirus: लॉकडाऊननंतरही अनावश्यक गर्दी टाळा!कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’चा वेबिनार

Coronavirus: लॉकडाऊननंतरही अनावश्यक गर्दी टाळा!कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’चा वेबिनार

Next

ठाणे : सध्याचा लॉकडाउन संपला, तरी नंतर किमान वर्षभर प्रत्येकाला अनावश्यक गर्दी टाळावी लागेल. त्याची सवय करून घ्या. सध्याच्या काळात सोसायटीतील प्रत्येकाने आपापल्या परीने अन्य सदस्यांना सहकार्याचा हात पुढे करावा, असे आवाहन ‘लोकमत’च्या वेबिनारमध्ये करण्यात आले.

‘लोकमत’ आणि महासेवातर्फे शनिवारी गृहनिर्माण संस्थांसाठी ‘कोरोना संकटात गृहनिर्माण सोसायट्यांनी घ्यायची खबरदारी,’ या विषयावर वेबिनार पार पडला. प्रीती किचन अप्लायन्सेसद्वारा समर्थित सारस्वत बँकेद्वारे तो सादर करण्यात आला. ‘लोकमत बेस्ट सोसायटी’ पुरस्काराच्या योजनेचा वेबिनार हा एक भाग होता. यात ५८० सोसायट्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या विषयातील तज्ज्ञांसोबतच उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनीही या वेबिनारमध्ये सहभागी होऊन सदस्यांना मार्गदर्शन केले. काही सूचना केल्या.

खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले, सर्व गृहनिर्माण संस्था नियमांचे काटेकोर पालन करीत आहेत. काळजी घेत आहेत. हे करताना कुणालाही त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी. जर आपल्या सोसायटीत कोणी कोरोनाबाधित रुग्ण आढळला, तर त्याची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी सोसायट्यांना केले. ‘लोकमत’च्या स्तुत्य उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी सर्व सोसायट्यांना केले.
नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी नोकरीनिमित्त बाहेरून आलेल्यांमुळे नवी मुंबईत कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात झाल्याचा मुद्दा मांडला. नवी मुंबई बाजार अ‍ॅपद्वारे धान्य पुरवठ्याची केलेली सोय, २४ तास टोल फ्री क्रमांकाद्वारे मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्याचा तपशील त्यांनी दिला. सर्व नागरिकांना नियम पाळण्याचा आणि कोरोनाबाधितांना सहकार्य करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी सोसायटीतील राजकारण सोडून व्यवस्थापकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. कोरोनाविरोधाच्या लढ्यात ठाणे महानगरपालिका रात्रंदिवस काम करत आहे, तरीही नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन त्यांनी केले. लॉकडाऊननंतरही पुढील वर्षभर अनावश्यक गर्दी टाळावी, असे त्यांनी सांगितले.

अभिनेते जयवंत वाडकर यांनी आपला अनुभव सांगितला. ते म्हणाले, मी बिंबीसारनगरमध्ये राहतो. कोरोनाचा रुग्ण सापडल्याने आमची सोसायटी सील केली होती. कुणीही बाहेर जाऊ शकत नव्हते व बाहेरून येऊ शकत नव्हते. कोरोनाची झळ आम्ही खूप जवळून अनुभवली.

भरघोस प्रतिसाद : मुंबईसह ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद येथील अनेक गृहनिर्माण संस्थांनी या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला. ओबेरॉय स्प्लेंडर- गोरेगाव, सॅटेलाइट पार्क- जोगेश्वरी, एसबीआय कॉलनी- नेरुळ, विजयनगर- अंधेरी, सहयोग सोसायटी- नागपूर, महिंद्रा स्प्लेंडर- भांडुप, मोराज सोसायटी- वाशी या व इतर अनेक सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना या वेबिनारमध्ये आपले मुद्दे मांडण्याची संधी मिळाली.

Web Title: Coronavirus: Avoid Unnecessary Crowds Even After Lockdown!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.