coronavirus: गणेशमूर्ती विसर्जनासाठी भिवंडी मनपा करणार मोबाईल ऍपचा वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 06:16 PM2020-08-18T18:16:11+5:302020-08-18T18:17:29+5:30
विसर्जन घाटावर होणारी गर्दी टाळण्यासाठी यंदा मोबाईल ऍप चा वापर केला जाणार असून गणेशभक्तांना ऑनलाईन दिलेल्या वेळेतच विसर्जन करता येणार आहे अशी माहिती महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी दिली आहे.
भिवंडी - सध्या सुरू असलेल्या कोरोना संक्रमण काळात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शासनाने नियम अटी लागू केल्या असतानाच भिवंडी महानगरपालिका गणेशोत्सव उत्सव काळात सर्व यंत्रणे सह सज्ज असून विसर्जन घाटावर होणारी गर्दी टाळण्यासाठी यंदा मोबाईल ऍप चा वापर केला जाणार असून गणेशभक्तांना ऑनलाईन दिलेल्या वेळेतच विसर्जन करता येणार आहे अशी माहिती महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी दिली आहे. गणेशोत्सव साजरा करणे बाबत भिवंडी पोलिस विभाग , सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी यांची संयुक्त बैठक सोमवारी पार पाडली असून यावेळी महापौर प्रतिभा विलास पाटील व आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी जनतेस गर्दी न करण्याचे आवाहन देखील केले आहे. यावेळी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे,अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे , स्थायी समिती सभापती हलीम अन्सारी, विरोधी पक्ष नेते यशवंत टावरे , सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष मदन भोई व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
भिवंडी शहरातील घरगुती गणेश मुर्तीची उंची 2 फुटापर्यंत तर सार्वजनिक गणेशोत्सवासाठी चार फुट उंच मुर्तीची मर्यादा ठेवण्यात आली आहे.तर गणेश आगमन व विसर्जन मिरवणूक गणेशभक्तांना काढता येणार नसून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपामध्ये थर्मल स्कॅनर आणि पल्स ॲाक्सीमीटरच्या साहाय्याने तपासणी बंधनकारक राहणार असल्याचे सांगत मंडपातील प्रत्येकाची नोंद ठेवण्याचे बंधन सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना घातले असून मंडपामध्ये वावरणाऱ्या प्रत्येकाने मास्क लावणे बंधनकारक असल्याचे महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी स्पष्ट केले .
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवासाठी राज्य शासनाने जाहिर केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे भिवंडी महानगरपालिकेने गणेशोत्सवासाठी आपली मार्गदर्शक नियमावली तयार केली असून गणेश आगमन आणि विसर्जनाच्यावेळी जास्तीत जास्त पाच लोक असावेत, गणपतीची सजावट पर्यावरणपूरक तसेच कमीत कमी असावी, राज्य शासना च्या नियमाप्रमाणे प्लास्टीक आणि थर्माकोलचा वापर करू नये, गणपतीच्या दर्शनासाठी, तीर्थप्रसाद व महाप्रसादासाठी गृहभेटी टाळाव्यात, विसर्जनस्थळी नागरिकांना कमीत कमी वेळ थांबता यावे यासाठी विसर्जन समयी निघताना गणेशभक्तांनी घरीच श्रीगणेशाची आरती करून घ्यावी . शक्यतो घराच्या आवारात, इमारतीच्या परिसरात विसर्जन करावे . विसर्जन घाटावर गणपतीचे विसर्जन करण्यात येत असताना महत्वपूर्ण सूचनांचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
मोठ्या गृहसंकुलाच्या ठिकाणी त्यांच्या संकुलातील गणेश मुर्तीचे विसर्जन सिंटेक्सच्या मोठ्या टाकीमध्ये करण्याची दक्षता घेण्याबरोबरच निर्माल्य स्वतंत्रपणे जमा करून विल्हेवाटीसाठी महापालिकेकडे सुपूर्द करण्यात यावे असे स्पष्ट करून भिवंडी महानगरपालिकेने नागरिकांनी शाडूच्या मातीची गणेशमुर्ती पुजावी व घरच्या घरी बादलीमध्ये विसर्जन करावे अथवा पीओपी गणपती मुर्ती बाबत विसर्जनासाठी अमोनिया बायकार्बोनेटचा वापर करावा असे आवाहन केले आहे.सार्वजनिक गणेशोत्सवासाठी नियमावली तयार करताना महापालिकेने कोरोना कोविडच्या पार्श्वभूमीवर सार्जनिक गणपतीची प्रतिष्ठापना करणे टाळावे असे आवाहन केले आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेश दर्शनासाठी शक्यतो केबल नेटवर्क, ॲानलाईन सुविधा अथवा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दर्शनाची व्यवस्था करावी असे स्पष्ट करून मिरवणूक, अन्नदान, महाप्रसाद आदी कार्यक्रमाना गर्दी टाळण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गर्दी आकर्षित होईल अशा प्रकारच्या जाहिराती प्रदर्शित न करता आरोग्यविषयक तसेच सामाजिक संदेश असणाऱ्या जाहिराती प्रदर्शित करण्यात याव्यात असेही महापालिकेच्या वतीने आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी स्पष्ट केले आहे.सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडपाची उंचीही 12 फुटांपेक्षा जास्त असणार नाही याची दक्षता घेण्याबरोबरच त्यासाठी आवश्यक ती परवानगी घेण्याची जबाबदारी मंडळांची राहणार आहे. त्याचबरोबर नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने केले आहे.