Coronavirus: उपचाराविना दोघांनी गमावले प्राण; अंबरनाथमधील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 02:00 AM2020-06-28T02:00:43+5:302020-06-28T02:00:51+5:30
उपचाराविना मृत्यू पावणाºया रुग्णांची संख्या अंबरनाथ पालिका क्षेत्रात वाढत असताना आता पालिकेच्या क्वारंटाइन सेंटरमधील रुग्णांचाही मृत्यू होत असल्याची बाब पुढे आली आहे.
अंबरनाथ : नगरपालिकेने उभारलेल्या क्वारंटाइन सेंटरमध्ये दोन कोरोना संशयित रुग्णांचा उपचाराविना मृत्यू झाला आहे. या रुग्णांची कोरोना चाचणी केल्यावर त्यांना महात्मा गांधी विद्यालयात ठेवले होते. त्यातील एकाची प्रकृती शुक्रवारी रात्री बिघडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याची प्रकृती गंभीर झाल्याने शनिवारी त्याला छाया रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.
उपचाराविना मृत्यू पावणाºया रुग्णांची संख्या अंबरनाथ पालिका क्षेत्रात वाढत असताना आता पालिकेच्या क्वारंटाइन सेंटरमधील रुग्णांचाही मृत्यू होत असल्याची बाब पुढे आली आहे. शुक्रवारी रात्री महात्मा गांधी विद्यालयातील सेंटरमध्ये डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली. त्यात दोन संशयित गंभीर असल्याने त्यांना छाया रुग्णालयात दाखल केले. तपासणीनंतर रात्री ११ वाजता याच सेंटरमध्ये एका रुग्णाला त्रास जाणवू लागला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकारानंतर मृत व्यक्तीच्या नातेवाइकांनी सेंटरमध्ये गोंधळ घातला. या मृत्यूला पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला. या प्रकाराला १२ तास उलटत नाही, तोच दुसºया एका रुग्णाला शनिवारी सकाळी श्वसनाचा त्रास सुरू झाला. त्याला छाया रूग्णालयात नेल्यानंतर त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. अवघ्या १२ तासांत क्वारंटाइन सेंटरमधील दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने छाया रुग्णालय व पालिका प्रशासनाचा बेजबाबदारपणा समोर आला आहे.
तपासले तेव्हा ‘त्या’ रुग्णाला त्रास नव्हता
शुक्रवारी मृत पावलेल्या व्यक्तीची डॉक्टरांनी तपासणी केली होती. मात्र, त्याला त्या क्षणाला कोणताही त्रास जाणवला नव्हता. अवघ्या दोन तासांत त्याची प्रकृती बिघडली. उपचारासाठी दाखल करण्याआधी त्यांचा मृत्यू ओढवला, तर शनिवारी ज्या रुग्णाची प्रकृती बिघडली, त्याला उपचारासाठी दाखल केले होते. परंतु, उपचार सुरू असताना मृत्यू झाला, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.