coronavirus: लॉकडाऊनमुळे कर्ज न काढता झालेल्या लग्नामुळे वधूपिते आनंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 04:11 AM2020-05-10T04:11:46+5:302020-05-10T07:42:43+5:30
लॉकडाउनमध्ये कार्य उरकल्याने दिलासा, मंडप, पंगती, रोषणाईवरील खर्च वाचला
- कुमार बडदे
मुंब्रा : लग्न म्हणजे बँडबाजा, बारात, पंगती, मानपान, कपडेलत्ते, दागदागिने... कोरोनामुळे घोषित लॉकडाउनच्या काळात लग्नाचे पक्के केलेले मुहूर्त चुकू नये, याकरिता काही वधूपित्यांनी आग्रह धरला आणि कर्जाच्या मोठ्या ओझ्याच्या संकटातून मुक्तता होत त्यांच्या कन्येचे दोनाचे चार हात झाले. त्यामुळे अशा अडल्यानडल्या वधूपित्यांकरिता कोरोना वरदान ठरला आहे.
लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात सारे असून अनेकजण बेरोजगारी, वेतनकपात वगैरे विविध समस्यांना सामोरे जात आहेत. देशभरात लक्षावधी मजूर हजारो किमी पायपीट करीत आहेत. त्यामुळे या साऱ्यांकरिता कोरोना हे भीषण संकट ठरणे स्वाभाविक आहे. परंतु लॉकडाउनच्या काळात मुलीचे लग्न उरकून घेण्याचा आग्रह धरणाºया धूर्त पित्यांची मोठ्या प्रमाणावर खर्चातून सुटका झाली आहे. जेथे दोन्हीकडचा खर्च वधूच्या मंडळींवर सोडला गेला होता, तेथे वधूपिता मनातून खूश झाला आहे तर जेथे खर्च निम्मा वाटून घेण्याचे ठरले तेथे दोन्हीकडचे यजमान बचतीमुळे आनंदी आहेत.
लॉकडाउन पुढेपुढे जाण्याची शक्यता असल्याने यंदाचे लग्नमुहूर्त संपत आले आहेत. ज्या मुलामुलींकरिता लागलीच पुन्हा वर्ष-दोन वर्षे लग्नयोग नाही त्यांच्या कुटुंबापुढे पेच निर्माण झाला होता. गर्दी न जमवता सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याच्या बंधनाचा स्वीकार करुन लग्न उरकून घेण्याचा पर्याय त्यांनी निवडला. अर्थात आपले लग्न धूमधडाक्यात होईल, या अपेक्षेने मनोरथ रचलेल्या नियोजित वधू-वराचा हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्या मंडळींच्या उपस्थितीत झालेल्या लग्नाने हिरमोड झाला. अशा प्रकारे अत्यंत साधेपणाने झालेल्या मुंब्रा येथील लग्नांचे काही व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरलही झाले आहेत.
सभागृह, मानसन्मान, पंगती, मंडप, डेकोरेशन, रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी यावरील खर्चाला आपसूक आळा बसल्याने या खर्चासाठी काढाव्या लागणाºया कर्जामधून वधूपित्याची सुटका झाली आहे.
मुलीची लग्न केल्यावर निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले अनेक वधूपिता लग्नाकरिता काढलेले कर्ज मरेपर्यंत फेडत राहतात किंवा आपला प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटीची रक्कम लग्नात उधळून कफल्लक होतात.
लॉकडाउनच्या दरम्यान आम्ही आमच्या मुलीचा लग्न समारंभ उरकून घेतला. मुलीचे लग्न या संकटाच्या काळातही ठरलेल्या मुहूर्तावर झाल्याने आम्ही आनंदीत आहोत. मुलीच्या डोक्यावर अक्षता पडल्याने एका मोठ्या कर्तव्यातून मोकळे झालो.
-अनिल आणि सुवर्णा गोडवे,
वधूपिता व माता