Coronavirus: नागरिकांनी घाबरुन न जाता महापालिकेस सहकार्य करावे -आयुक्त अभिजीत बांगर

By अजित मांडके | Published: December 22, 2023 02:58 PM2023-12-22T14:58:40+5:302023-12-22T14:58:44+5:30

कोरोना जेएनवन ओमायक्रॉन विषाणूच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने सतर्क रहावे

Coronavirus: Citizens should cooperate with the Municipal Corporation without panicking - Commissioner Abhijit Bangar | Coronavirus: नागरिकांनी घाबरुन न जाता महापालिकेस सहकार्य करावे -आयुक्त अभिजीत बांगर

Coronavirus: नागरिकांनी घाबरुन न जाता महापालिकेस सहकार्य करावे -आयुक्त अभिजीत बांगर

ठाणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभुमीवर ठाणे महापालिकेने देखील आता काही महत्वाची पावले उचलली आहे. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी या संदर्भात महापालिकेच्या आरोग्य विभागाची बैठक घेऊन त्यांना काही महत्वाच्या सुचना दिल्या आहेत. RTPCR  चाचण्यांची संख्या वाढविणे, सर्व आरोग्य केंद्रातील तापाच्या ओपीडीमध्ये येणाऱ्या नागरिकांची कोविडची चाचणी करावी. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात बेडची संख्या वाढविणे आदी सूचना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी गुरूवारी झालेल्या बैठकीत आरोग्य विभागाला दिल्या आहेत.

रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची कोविडची चाचणी चाचणी करण्यात यावी अशा सूचना आयुक्त त्यांनी  यावेळी दिल्या. एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यास त्याला उपचारार्थ दाखल करुन घेण्यात यावे. तसेच त्याच्या नातेवाईकांच्या चाचण्या करुन जर लक्षणे आढळल्यास गरज भासल्यास त्यांनाही उपचारार्थ रुग्णालयात दाखल करावे. तसेच यापैकी काही व्यक्तींना उच्च रक्तदाब, मुधमेह किंवा इतर गंभीर आजार असतील अशा व्यक्तींना रुग्णालयात दाखल करावे व होम कोरंटाईन असलेल्या रुग्णांचाही नियमित पाठपुरावा करुन त्यांना देखील आवश्यक असलेली औषधे उपलब्ध करुन देण्याच्या सूचना यावेळी आयुक्तांनी दिल्या.

चाचण्यांची संख्या वाढविण्यात यावी
महापालिका कार्यक्षेत्रात दैनंदिन ३५० चाचण्या करण्यात येत आहेत, यामध्ये वाढ करुन प्रतिदिन १००० पर्यंत चाचण्या करण्यात याव्यात. या चाचण्यामध्ये आरटीपीसीआर व अँटीजेन टेस्ट यांचे प्रमाण हे ६० : ४० असे राखण्यात यावे, आरटीपीसीआरच्या चाचण्या जास्तीत जास्त करण्यावर भर देण्यात यावा. आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट २४ तासापेक्षा जास्त प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. सर्व नागरी आरोग्य केंद्र व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील फ्लयू ओपीडीमधील सर्व रुग्णांची कोविड चाचणी अनिवार्य करण्यात यावी. त्याच पध्दतीने रेल्वे स्टेशन, मार्केट परिसर या ठिकाणी रँडम टेस्टींग करण्यात याव्यात. शहरामध्ये कोविडचे सात सक्रिय रुग्ण असून एक रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहे तर ६ रुग्ण होमआयसोलेशनमध्ये असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात बेडची संख्या वाढवावी
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी आयसोलेशन कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्यामध्ये सध्या २० बेड उपलब्ध असून सद्यस्थितीत एक रुगण दाखल आहे. जर उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली तर त्या पटीत बेडची  संख्या वाढविण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत बेडची  कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी.

अत्यावश्यक औषधे व यंत्रणेची पुरेशी व्यवस्था करावी
आगामी काळात रुग्णांची संख्या वाढल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेली औषधे उपलब्ध असतील याबाबत दक्षता घ्यावी. तसेच तातडीची बाब म्हणून रेमडेसीवार इंजेक्शन खरेदी करावेत. जर रुग्णालयामध्ये दाखल रुग्णांची संख्या वाढली तर त्यासाठी पूर्वतयारी म्हणून ऑक्स‍िजनची उपलब्धतता सुनिश्चित करावी, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील कोविड आयसोलेशन वॉर्ड, तसेच पार्किंग प्लाझा या ठिकाणी ऑक्सिजन ऑडिट, फायर ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिट करुन घेण्यात यावे.  वैद्यकीय इलेक्ट्रिक उपकरणे जसे व्हेंटीलेंटर, मॉनिटर इ. याचा मेंटेनन्स अतितात्काळ पध्दतीने पूर्ण करुन घ्यावा. तसेच याकामी आवश्यकता असल्यास अल्प मुदतीची निविदा काढून पुढील कार्यवाही तातडीने करावी.

एखाद्या व्यक्तीला ताप, सर्दी, खोकला असेल अशांनी नजिकच्या आरोग्य केंद्रात आवश्यक ती तपासणी करुन घ्यावी, तसेच राज्य व महापालिकेने जारी केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन नागरिकांनी करावे असेही आवाहन आयुक्त अभिजीत बांगर यांनी यावेळी केले.  तसेच महापालिका कार्यक्षेत्रातील दैनंदिन साफसफाई, औषध, धूर फवारणी देखील अधिक गतिमानतेने करावी असेही आदेश यावेळी दिलेत.
आजाराला घाबरुन न जाता, आवश्यक ती काळजी व उपाय योजना करुन नागरिकांनी सतर्क रहावे तसेच नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच प्रत्येकाने आपल्या सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक ती काळजी घ्यावी व महापालिकेस सहकार्य करावे असेही आवाहन आयुक्तांनी यावेळी केले. या बैठकीस उपायुक्त उमेश बिरारी, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगांवकर, डॉ. राकेश शर्मा आदी उपस्थित होते.

Web Title: Coronavirus: Citizens should cooperate with the Municipal Corporation without panicking - Commissioner Abhijit Bangar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.