CoronaVirus: खलाशांना उतरण्याचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 12:44 AM2020-04-24T00:44:04+5:302020-04-24T00:44:22+5:30
‘लोकमत’च्या वृत्ताची दखल : खलाशांच्या कुटुंबीयांमध्ये आनंद
बोर्डी : पाच दिवसांपासून डहाणू बंदरात उतरण्याची वाट पाहणाऱ्या खलाशांना दिलासा देणारा निर्णय शासनाने घेतला असून शुक्रवारी त्यांना उतरविले जाणार आहे. हा प्रश्न ‘लोकमत’ने मांडल्यानंतर या वृत्ताची दखल पालकमंत्री दादा भुसे आणि खासदार राजेंद्र गावित यांनी घेतली. या निर्णयामुळे खलाशी आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
गुजरात बंदरातून पालघर जिल्ह्यातील खलाशी मागील पाच दिवसांपासून डहाणू खाडी येथे उतरण्यासाठी प्रशासनाच्या निर्णयाची वाट पाहत तालुक्याच्या समुद्रहद्दीत बोटी नांगरून आहेत. मात्र त्यांना उतरविण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून परवानगी नसल्याने स्थानिक प्रशासनाकडून खलाशांना उतरविले जात नव्हते. त्यांच्या जवळचा जीवनावश्यक वस्तूंचा साठा संपल्यानंतर, मासेमारी करणाºयासाठी आलेल्या स्थानिकांना विनंती केल्याने त्यांनी पुरवठा केला. दुसरीकडे कुटुंबीय घरी परतण्याची आतुरतेने वाट पाहत असताना पुन्हा गुजरात बंदरात माघारी परतण्याची वेळ त्यांच्यावर ओढवणार होती.
उंबरगाव बंदरात स्वजिल्ह्यातील खलाशांसह घडलेल्या दुर्दैवी घटनेची ही पुनरावृत्ती असल्याची खलाशांची संतप्त भावना ‘लोकमत’ने बातमीतून मांडली. त्याची दखल खासदार राजेंद्र गावित, पालकमंत्री दादा भुसे यांनी घेतली असून कमिशनर शिवाजीराव दौंड यांनी जिल्हा प्रशासनाला खलाशांना शुक्रवारी बंदरात उतरविण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेना पक्ष हा नेहमीच मच्छीमारांच्या हिताचा विचार करणारा पक्ष असून पालकमंत्री दादा भुसे आणि खासदार राजेंद्र गावित यांनी परराज्यात रोजगारासाठी गेलेल्या खलाशी कामगारांना जिल्ह्यात प्रवेश देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे.
- वैभव संखे, पालघर विधानसभा क्षेत्र प्रमुख