Coronavirus : वातावरणबदल ठाणेकरांसाठी ठरु शकतो फायदेशीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 02:03 AM2020-03-17T02:03:16+5:302020-03-17T02:03:22+5:30
सध्या कोरोना रुग्णांची संख्या ज्या पद्धतीने झपाट्याने वाढत आहे, ती काळजी करणारी असून त्यावर हे वातावरण कितपत फायदेशीर ठरणार याबाबतही शंका उपस्थित होत आहेत.
ठाणे : कोरोना व्हायरस रोखण्यासाठी हवामानातील बदलही महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे मागील काही दिवस उष्णतेची लाट सहन करणाऱ्या ठाणेकरांसह जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. उष्ण कटिबंधातील देशात हा व्हायरस जास्त फैलावू शकत नाही, असे सांगितले जाते. मात्र, सध्या कोरोना रुग्णांची संख्या ज्या पद्धतीने झपाट्याने वाढत आहे, ती काळजी करणारी असून त्यावर हे वातावरण कितपत फायदेशीर ठरणार याबाबतही शंका उपस्थित होत आहेत.
उष्ण कटिबंधातील देशांना किंवा राज्यांना या व्हायरसचा धोका कमी प्रमाणात असल्याचे बोलले जात होते. परंतु, मागील काही दिवसांत ठाण्यातील वातावरण वाढत नव्हते. होळी झाल्यानंतर साधारणपणे वातावरणात बदल होताना दिसते. मात्र, यंदा होळीनंतरही जवळजवळ एक आठवडा वातावरण थंड होते. शनिवारपर्यंत दिवसाचे तापमानही २० ते २२ अंश सेल्सिअसपर्यंतच होते. त्यामुळे वातावरणात गारवा दिसत होता. त्यामुळे हे वातावरण बदलावे आणि उष्ण वातावरण सुरू व्हावे, अशी अपेक्षा तमाम नागरिक व्यक्त करीत होते. अखेर, सोमवारी वातावरणात बदल झाल्याचे दिसून आले. शहरातील तापमान जवळजवळ ३४ अंश सेल्सिअसपर्यंत गेले होते. अचानक झालेल्या या बदलाचे स्वागत सर्वांनीच केले आहे. आता यामुळे कोरोनाचे सावट कमी होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. परंतु, तसे होईल का? याबाबतही शंका उपस्थित केल्या जात आहेत.
सध्या राज्याची परिस्थिती पाहता रुग्णांची संख्या ३९ वर गेली आहे. जिल्ह्यातही रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. वातावरणबदल हा चांगला असला, तरी काळजी घेणे हे महत्त्वाचे आहे. सध्या आपण दुसºया स्टेजवर आहोत. पुढील १५ दिवस खूप काळजीचे आहेत. त्यामुळे प्रत्येकाने याबाबत काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.
- कैलाश पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे सिव्हिल रुग्णालय