Coronavirus : बंदमुळे एकमेकांसोबत वेळ घालवायला मिळतेय संधी, नोकरदार दाम्पत्यांची भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 01:23 AM2020-03-18T01:23:58+5:302020-03-18T01:26:23+5:30
घरी असल्याने कुटुंबाला दिला जातोय वेळ; स्वयंपाकाची घाई, लोकलच्या गर्दीपासून सुटका,
ठाणे : महाराष्ट्रात पसरलेल्या कोरोनामुळे सरकारने अनावश्यक बाहेर पडण्यावर बंदी घातली. त्यामुळे अनेक खासगी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे या बंदमुळे एकमेकांसोबत, कुटुंबासोबत वेळ घालविण्याचीही संधी मिळाली. वर्क फ्रॉम होममुळे दोघांना दुपारचे जेवण तरी एकत्र करता येते, अशा भावना नोकरदार दाम्पत्यांनी व्यक्त केल्या आहेत.
हल्ली पती-पत्नी दोघेही नोकरी करणारे असल्याने त्यांना एकमेकांसोबत वेळ घालविण्यासाठी क्वचितच निवांत क्षण मिळतो. त्यात सुट्टी असली तरी शिल्लक कामे, किंवा आॅफिसच्या एखाद्या अचानक आलेल्या कामामुळे हा सुट्टीचा वेळ त्यातच निघून जातो. एखाद्या वेळी सुट्टी घ्यायची झाली तरी दोघांना ती एकत्र मिळतेच, असे नाही. त्यामुळे सुखाचे क्षण घालवायचे असतील तर त्या दोघांनाही मे महिना, दिवाळी किंवा नाताळच्या सुट्टीत योजना आखावी लागते; परंतु कोरोनापासून वाचण्यासाठी सरकारी यंत्रणेने उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
अनावश्यक बाहेर जाणे टाळावे, असे आवाहन सरकारकडून केले आहे. त्यामुळे या बंदचा फायदा नाते जपण्यासाठी घ्या, असा सल्ला पुण्यातील मानसोपचारतज्ज्ञांनी दिला आहे. याबाबत ठाण्यातील दाम्पत्यांनी गमावलेले सुख परत मिळवण्याची, तसेच एकमेकांना आणखीन जाणून घेण्याची मिळालेली ही संधी असल्याचे मत व्यक्त केले आहे. तर जे पुरुष स्वत: एकटे कमवत आहेत त्यांनीही आपल्या पत्नीसह, मुलांबरोबर वेळ घालविण्याची ही संधी असल्याचे सांगितले. काही नोकरदार महिलांनी तर प्रवासाचा त्रास वाचला असल्याचे सांगितले.
घरातून काम करायला आमच्या कंपनीने आम्हाला मुभा दिली आहे; परंतु कामाचा ताण वाढलेला नाही. मुलांच्या शाळाही बंद असल्याने फारशी काळजी जाणवत नाही. आम्ही दोघेही एकमेकांना घरातील कामात मदत करत आहोत. घरातून काम करण्याच्या मिळालेल्या संधीमुळे कुटुंबासोबत चांगला वेळ घालविता येत आहे; पण त्याचबरोबर कामही करीत आहोत. घरातून काम करीत असल्याने मला खूप सुरक्षित वाटते आहे. माझा प्रवासाचा त्रास तर वाचलाच आहे. घरातील काम लवकर आवरून आॅफिसचे काम मी करीत आहे.
- प्रणिता सावंत
घरून काम करण्याचा सगळ्यात जास्त फायदा म्हणजे लवकर उठून स्वयंपाक करण्याच्या घाईपासून सुटका. ट्रेनमध्ये होणारा त्रास हा आपण ठाणेकर नेहमीच अनुभवतो, त्या त्रासाला तोंड द्यावे लागत नाही यापेक्षा उत्तम सुटका असूच शकत नाही. थोडी उसंत मिळाली. हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात संवाद थोडा कमी झाला होता आणि तो आता करता येतोे.
- देवश्री साटम
आम्ही दोघे वेगळ्या क्षेत्रात काम करतो; पण तिच्या घरी असण्याने दोन्ही क्षेत्रांची जुजबी का होईना ओळख निर्माण झाली. दुपारचे जेवण एकत्र करण्याचे सुख आम्ही गमावलेच होते, ते परत मिळाले. घरच्या कामाची विभागणी; पण उत्तम जमली आहे. त्यामुळे कोरोनामुळे मिळाले हा वेळ असाच राहावा, असेही वाटू लागले आहे. - दिवाकर साटम
वर्क फ्रॉम होमचा फायदा कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी होईल. यामुळे प्रवासाच्या त्रासातून सुटका झाली आहे. ज्या वेळी वाहतूककोंडीत अडकायचो, त्याचवेळी घरी कामास सुरुवात करीत आहे. काम वाढेल पण प्रवास वाचल्यामुळे वरिष्ठांना जास्त कामाची अपेक्षा असणार. वर्क फ्रॉम होम भविष्यातील पर्याय असतील, कॉर्पोरेटसाठी त्याची एक प्रकारे ही चाचणीही ठरेल. - दीपक जाधव
घरात काम करून करायला सांगितले म्हणजे फक्त वातावरण बदलले आहे, हे लक्षात घेतले तर तुमचे काम उत्तम होईल. घरी आहे तर आरामात काम करू हे लक्षात घेतले तर तुमचे नातेसंंबंध बिघडतील. त्यामुळे कामही होणार नाही. घरातून काम करताना वेळेचे नियोजन करावे. आॅफिसचे काम आणि कुटुंबाचा वेळ हे दोन्ही एकत्र करू नये. कामात दुर्लक्ष केले किंवा त्यात हस्तक्षेप झाला तर काम न होता उलट भांडणे होतील.
- शैलेश उमाटे, मानसोपचारतज्ज्ञ