CoronaVirus News: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज रुग्णालयाचे ई-लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 11:45 PM2020-06-16T23:45:04+5:302020-06-16T23:46:09+5:30
ठाणे महापालिकेचे १००० बेडचे हे रुग्णालय म्हणजे ‘ड्रीम प्रोजेक्ट' मानला जातो.
ठाणे : वाढत्या कोरोना रुग्णांसाठी माजिवडा येथील ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे उभारलेल्या १ हजार बेडचे रुग्णालय बुधवारपासून सुरू होत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या रुग्णालयाचे ई-लोकार्पण होणार आहे. काही दिवसांपासून हे रुग्णालय सुरू करण्यासाठी पालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू असून पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापौर नरेश म्हस्के यांचा सतत पाठपुरावा सुरू होता. एमसीएचआय, जितो आणि ठाणे महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने हे रुग्णालय सुरू करण्यात आले आहे.
ठाणे महापालिकेचे १००० बेडचे हे रुग्णालय म्हणजे ‘ड्रीम प्रोजेक्ट' मानला जातो. हे रुग्णालय सुरू करण्यासाठी गेले काही दिवस पालिका प्रशासनाकडून कसोशीने प्रयत्न सुरू होते. रुग्णालय सुरू व्हावे यासाठी ठाण्यात आणखी एका आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. रुग्णालयाच्या उभारणीवरूनदेखील भाजपचे नगरसेवक नारायण पवार आणि मनोहर डुंबरे यांनी काही मुद्दे उपस्थित केले होते. माजी मंत्री आशिष शेलार यांनीदेखील यासंदर्भात टीका केली होती.