coronavirus: दिलासादायक! ठाणे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट; आज सापडले केवळ 881रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 08:26 PM2020-08-23T20:26:22+5:302020-08-23T20:27:01+5:30
आजपर्यंत जिल्ह्यात एक लाख 14 हजार 765 रुग्णांची तर तीन हजार 268 मृतांची नोंद झाली आहे.
ठाणे - जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस घट होताना दिसून येत आहे. रविवारी केवळ 881 रुग्णांचा शोध लागला तर फक्त 28 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात घेण्यात आली आहे. आजपर्यंत जिल्ह्यात एक लाख 14 हजार 765 रुग्णांची तर तीन हजार 268 मृतांची नोंद झाली आहे.
आज ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचे 130 रुग्ण आढळले आहेत. यामुळे शहरात 24 हजार 459 रुग्णांची नोंद आतापर्यंत करण्यात आली. याशिवाय आज फक्त पाच जणांचा मृत्यू झालेला आहे. यामुळे आजपर्यंत 787 मृतांची नोंद ठाणे परिसरात झाली. तर कल्याण - डोंबिवली मनपा क्षेत्रात 218 रुग्णांची आज नोंद झाली असून आठ जणांचे मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत 26 हजार 623 रुग्ण बाधीत झाल्याची तर 556 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या परिसरात 316 रुग्णांची तर पाच जणांच्या मृत्यूची नोंद आज घेण्यात आली आहे. या शहरात आतापर्यंत 23 हजार 321 बाधितांची तर 542 मृतांची संख्या झाली आहे. उल्हासनगर परिसरातही 19 रुग्ण तर चार मृतांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे आतापर्यंत जणांच्या मृत्यूसह सात हजार 585 रुग्णांची आणि 209 मृतांची नोंद उल्हासनगरला झालेली आहे. सर्वाधिक दाट लोकसंख्येच्या या शहरात देशभरात रुग्ण बरे होण्याचे सर्वाधिक प्रमाण असल्याचे समाधान व्यक्त केले जात आहे.
भिवंडी मनपा क्षेत्रात गेल्या 24 तासात एकही दगावला नसून केवळ 13 रुग्ण सापडले आहेत. आता या शहरात चार हजार 62 बाधितांची संख्या असून मृतांची संख्या 281 झाली आहे. मीरा भाईंदरला 77 रुग्णांची तर, चार जणांच्या मृतांची नोंद आज झाली आहे. या शहरात बाधितांची संख्या 11 हजार 596 असून 390 मृतांची आजपर्यंत नोंद झाली आहे.
अंबरनाथमध्ये 32 रुग्णांची वाढ झाली असून एकाच्या मृत्यूची नोंद आज करण्यात आली आहे. आता बाधितांची संख्या चार हजार 697, तर, मृतांची संख्या 181 झाली आहे. बदलापूरमध्ये 32 रुग्णांची नोंद आज झाल्यामुळे बाधितांची संख्या तीन हजार 813 झाली. या शहरात आज एकही मृत्यू झाला नाही. त्यामुळे मृत्यूची 65 ही संख्या कायम आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या गांवपाड्यांत 44 रुग्ण सापडले असून एकाचा मृत्यू झाला आहे. आता बाधितांची संख्या आठ हजार 603 तर मृत्यू 258 वर गेले आहेत.