Coronavirus: नौपाडा प्रभागात आयुक्तांचा पाहणी दौरा; कोरोनामुक्त रूग्णांशी साधला संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 02:39 AM2020-07-03T02:39:24+5:302020-07-03T02:39:32+5:30
रोज एका परिसराला भेटीचा लावला सपाटा
ठाणे : रोज एकेका प्रभाग समितीला भेट देऊन तेथील कोरोनाची परिस्थिती समजून घेण्याचा सपाटा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी लावला असून बुधवारी चार तास नौपाडा प्रभाग त्यांनी पिंजून काढला. दौऱ्यात त्यांनी कोरोनामुक्त झालेल्या कोविड योद्धे यांच्याशी संवाद साधून त्यांची विचारपूस केली.
बुधवारी सकाळी दहा वाजता आयुक्तांनी महापौर नरेश म्हस्के यांच्या समवेत कोपरी आनंदनगर परिसराची पाहणी केली. आनंदनगर येथे सुरू असलेले फिव्हर क्लिनिक, सार्वजनिक शौचालये, तसेच गल्ल्यांमध्ये जावून तेथील स्वच्छता, साफसफाई, नालेसफाई आदींची पाहणी केली. चेंदणी कोळीवाडा या प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. कोळीवाडा परिसरातील एकविरा देवी मंदिर रोड, विठ्ठल मंदिर रोड, स्व. नारायणराव कोळी चौक, कोळीवाडा गाव, मीठबंदर रोड, चंद्रकांत नाखवा कोळी चाळ, सिमेंट गल्ली, युनायटेड स्पोर्टस, आनंदभारती, हरियाली तलाव, राऊत शाळा या परिसराची पाहणी केली. त्यांच्यासमवेत नगरसेवक भरत चव्हाण, स्थानिक नेते रमाकांत पाटील, माजी नगरसेवक गिरीष राजे, श्रुतिका मोरेकर आदी उपस्थित होते.
आयुक्तांनी बी केबीन, रेल्वे लाईन येथील प्रतिबंधित क्षेत्राचीही पाहणी केली. येथील कोरोनामुक्त झालेल्यांची विचारपूस केली. यावेळी त्यांच्यासमवेत ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, नगरसेवक सुनेश जोशी, नगरसेविका मृणाल पेंडसे, नम्रता कोळी आदी उपस्थित होते. जांभळी नाका मुख्य धान्य बाजाराचीही पाहणी केली. तसेच नागसेन नगर, खारटन रोडला भेट दिली. या ठिकाणी स्थानिक नगरसेवक सुधीर कोकाटे, सुनील हंडोरे आदी उपस्थित होते.
डॉ. शर्मा यांनी हाजुरी, मनोरूग्णालय परिसराची पाहणी केली त्यावेळी त्यांच्यासमवेत स्थानिक नगरसेवक तथा शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे, नगरसेविका सौ. नम्रता फाटक, माजी नगरसेविका आणि वृक्ष प्राधिकरण समिती सदस्या नम्रता भोसले आदी उपस्थित
होते. या दौºयात महापालिका आयुक्तांसमवेत अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उपआयुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर, सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे, कार्यकारी अभियंता अमृतकर आदी उपस्थित होते. त्यांनीही नागरिकांकडून माहिती घेतली.
भाईंदरपाडा येथील क्वारंटाइन सेंटरला दिली भेट
- महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी भार्इंदरपाडा येथील क्वारंटाइन सेंटर तसेच होरायझन स्कूल येथील अॅसिम्टोमॅटिक कोविड हॉस्पिटला भेट दिली.
- यावेळी त्यांनी तेथील डॉक्टर्सची संवाद साधला. तसेच त्या ठिकाणी देण्यात येणारे भोजन व इतर सुविधांसह रुग्णांना प्रोटोकॉलप्रमाणे औषधोपचार करण्यात येतातका, याची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी न्यू होरायझन स्कूलमधील अॅसिम्टोमॅटिक हॉस्पिटलला भेट देऊन रुग्णांवरील उपचार व साफसफाई योग्य पद्धतीने केली जाते की नाही, याची पाहणी केली.
- यावेळी त्यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उपायुक्त अशोक बुरपल्ले, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर, डॉ. राजीव कोर्डे आदी उपस्थित होते.