Coronavirus : कल्याणमध्ये दुकानदारांकडून बंदी आदेशाचे उल्लंघन, एका दुकानदाराविरोधात तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 02:39 AM2020-03-21T02:39:59+5:302020-03-21T02:40:07+5:30
कपडा, सोने-चांदी, चप्पल विक्रे त्यांचा समावेश होता. सकाळी ११ वाजल्यानंतर संबंधित दुकाने उघडी असल्याचे चित्र कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाहायला मिळाले.
कल्याण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारच्या सूचनेनुसार केडीएमसीने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, आस्थापना वगळता अन्य दुकाने आणि आस्थापने शुक्रवारी सकाळी ११ वाजल्यापासून बंद राहतील, असे आदेश गुरुवारी काढले होते; परंतु या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे चित्र शुक्रवारी सकाळी पाहायला मिळाले. यात जीवनावश्यक वस्तू नसणारी दुकानेही चालू राहिल्याने अखेर पोलिसांनी रस्त्यावर उतरून संबंधित दुकानदारांना समज दिली. बंदी आदेशाचे उल्लंघन झाल्याप्रकरणी एका दुकानचालकाविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल झाली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव आणि प्रसार टाळण्यासाठी राज्य सरकारच्या आदेशानुसार केडीएमसी हद्दीतील मॉल, नाट्यगृहे, चित्रपटगृह, शाळा आणि महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवली गेली आहेत. सरकारी कार्यालयांनीही गर्दी टाळण्यासाठी ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची अंमलबजावणी सुरू केली आहे. या नंतरही गर्दी कायम राहिल्याने केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सरकारच्या सूचनेनुसार दुकाने बंद ठेवण्याचे आदेश गुरुवारी दिले होते. मात्र, या बंदीतून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळण्यात आली आहेत; परंतु आदेशाकडे दुर्लक्ष करीत काही दुकानदारांनी आपली दुकाने चालूच ठेवली.
यात कपडा, सोने-चांदी, चप्पल विक्रे त्यांचा समावेश होता. सकाळी ११ वाजल्यानंतर संबंधित दुकाने उघडी असल्याचे चित्र कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाहायला मिळाले. त्यामुळे पोलिसांनी दुकानदारांना समज देत ती बंद करण्यास भाग पाडले. आदेशाचे उल्लंघन करणाºया दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी दक्ष नागरिकांनी केली आहे.
राज्य सरकारच्या सूचनेनुसार आणि महापालिकेने जारी केलेल्या परित्रकानुसार अत्यावश्यक सेवेतील दुकान वगळता इतर बहुतांश दुकाने शहरात बंद होती; परंतु रस्त्यावरील नागरिकांची वर्दळ मात्र कमी झालेली नव्हती. दुपारी मात्र रस्त्यांवर शुक शुकाट दिसून आला.
दरम्यान, बाजारपेठ पोलिसांची गस्त सुरू असताना बारदान गल्लीत शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता एक दुकानदार दुकान चालू ठेवून मालाची विक्री करताना आढळला. त्याच्याविरोधात पोलिसांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
रिक्षा बंदमुळे झाले हाल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक वाहतूक संदर्भात केलेल्या आवाहनानंतर कल्याणमधील रिक्षा शुक्रवारी दुपारी १:३० नंतर बंद करण्यात आल्या. मात्र, त्यामुळे प्रवाशांचे आतोनात हाल झाले.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था प्रमुख घटक म्हणून रिक्षाकडे बघितले जाते. दररोज अगणित प्रवाशांची वाहतूक रिक्षातून होत असते.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडून अनेक उपाययोजना करीत आहे. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी शहरातील रिक्षा शनिवारी आणि रविवारी स्वच्छेने बंद ठेवाव्यात, असे आवाहन रिक्षाचालकांना केल्याची माहिती कोकण रिक्षा-टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी दिली.