Coronavirus : पालिका आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या आदेशांमुळे उडाला गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 01:58 AM2020-03-21T01:58:01+5:302020-03-21T01:58:16+5:30
कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून अखेर कठोर निर्णय घेण्याची वेळ सरकारवर आली आहे
मीरा रोड : कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून अखेर कठोर निर्णय घेण्याची वेळ सरकारवर आली असली, तरी मीरा-भाईंदर महापालिकेने आधी २३ मार्चपर्यंतच जीवनावश्यक वस्तू व काही सेवा वगळून सर्व दुकाने बंंद ठेवण्याचे आदेश काढले. पालिका व पोलिसांनी फिरून तशा सूचना देणे सुरू केले. परंतु, सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आल्याने नागरिकांमध्ये गोंधळ उडाला. परंतु, जिल्हाधिका-यांचा आदेश हाच अंतिम असून तो सरकारचा अधिकृत निर्णय असल्याने त्याचे पालन करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
मीरा-भार्इंदर महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने शुक्रवारी शहरातील पोलीस अधिकाºयांसह पालिका अधिकाºयांच्या बैठका घेतल्या. त्यामध्ये आयुक्तांनी आदेश काढून शहरातील औषधांची दुकाने, दूध, बँक, एटीएम, पॅथॉलॉजी लॅब, रुग्णालये, दवाखाने, निदान केंदे्र, कॉल सेंटर, एटीएम व बँक वगळता अन्य सर्व दुकाने-आस्थापना शुक्रवारी सायंकाळी ५पासून २३ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत बंद ठेवण्याचे जाहीर केले. याशिवाय फेरीवाले, हातगाड्या बंदचे आदेश दिले. अन्यथा, कारवाईचा इशारा देण्यात आला होता.
आयुक्तांच्या आदेशानुसार महापालिकेच्या प्रभाग अधिकाºयांनी तसेच कर्मचाºयांनी पोलिसांसोबत शहरात फिरून बंदचे आवाहन सुरू केले. दरम्यान, गुरुवारी रात्री पोलीस उपअधीक्षक डॉ. शशिकांत भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार, चंद्रकांत जाधव आदींनी त्यांच्या भागातील कपडा, सराफा आदी व्यापा-यांच्या बैठका घेऊन दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने व्यापा-यांनी दुकाने शुक्रवारपासून बंद केली होती. त्यामुळे शहरात आजपासूनच व्यापाºयांच्या सहकार्याने दुकाने बंद झाल्याने शुकशुकाट जाणवत होता.
आयुक्तांच्या आदेशानंतर सायंकाळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचा आदेश आला. त्यात ३१ मार्चपर्यंत दूध डेअरी, औषधांची दुकाने, किराणा, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व आस्थापना बंद करण्याचा आदेश जारी झाला आहे. तसेच हॉटेल, बीअर बार, वाइन शॉपही बंद असतील. परंतु, त्यातील केवळ हॉटेलमधून जेवण पार्सल घेऊन जाणे यासाठीच फक्त सवलत दिलेली आहे. त्यामुळे मद्यविक्री वा पार्सल देता येणार नाही, असे स्पष्ट झाले आहे. किराणा, दूध, भाजीपाला, औषध दुकानांत स्वच्छता ठेवण्यासह नागरिकांकरिता हॅण्डवॉश व सॅनिटायझर ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी हे सक्षम प्राधिकारी असल्याने त्यांच्या आदेशाचीच काटेकोर अंमलबजावणी करणे पालिका व पोलीस प्रशासनासह सर्वांनाच बंधनकारक असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.