coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ, २०६४ नवे रुग्ण, मृतांची संख्या दीड हजार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 05:58 AM2020-07-11T05:58:20+5:302020-07-11T05:58:28+5:30
ठाणे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ही तब्बल ५० हजार ९२०, तर मृतांची एक हजार ५०७ वर पोहोचली आहे.
ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली असून शुक्रवारी कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात सर्वाधिक नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. ठाणे मीरा-भार्इंदरसह कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून टाळेबंदीत वाढ केली असताना, जिल्ह्यात अवघ्या २४ तासांत २0६४ नवीन रु ग्णांची नोंद झाली तर ५३ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ही तब्बल ५० हजार ९२०, तर मृतांची एक हजार ५०७ वर पोहोचली आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या क्षेत्रात १० जुलै रोजी सर्वाधिक ६०६ रुग्ण नव्याने दाखल झाले, तर आठ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे बाधितांची ११ हजार ५३७ तर मृतांची संख्या १७२ इतकी झाली. त्यापाठोपाठ ठाणे महापालिका परिसरात बाधितांची ४१६ तर १७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. या ठिकाणी बाधितांची १२ हजार ४६९ तर, मृतांची संख्या ४८२ इतकी झाली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात नवे ३६१ रुग्ण दाखल झाले तर सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या आठ हजार ८१९ तर, मृतांचा आकडा २८४ इतका झाला आहे. मीरा-भार्इंदरमध्ये २३१ रुग्णांची तर दोघांच्या मृत्यूची नोंद झाल्याने या ठिकाणी बाधितांची पाच हजार २०६ तर मृतांची संख्या १७८ वर पोहोचली आहे. भिवंडी पालिका क्षेत्रात ५७ बाधित तर सात जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या दोन हजार ६४० तर मृतांची संख्याही १४१ च्या घरात गेली आहे.