coronavirus: परीक्षा रद्दबाबत मतमतांतरे, शैक्षणिक नुकसान होण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 12:51 AM2020-07-09T00:51:15+5:302020-07-09T00:51:57+5:30

शिक्षण संस्थाचालक, प्राचार्य यांनीदेखील परीक्षा घेण्यात याव्या, असे मत व्यक्त केले आहे. कोरोनामुळे परीक्षा घ्याव्यात की रद्द कराव्या, या संदर्भात गोंधळ सुरू आहे. परीक्षा न घेण्यावर ठाम असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे.

coronavirus: Controversy over exam cancellation, fear of academic loss | coronavirus: परीक्षा रद्दबाबत मतमतांतरे, शैक्षणिक नुकसान होण्याची भीती

coronavirus: परीक्षा रद्दबाबत मतमतांतरे, शैक्षणिक नुकसान होण्याची भीती

Next

ठाणे : विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला ठाण्यातील काही विद्यार्थ्यांनी पाठिंबा तर काहींनी विरोध दर्शविला आहे. आधीच्या परीक्षांचे गुण विचारात घेऊन अंतिम परीक्षेचे गुण देण्यात यावे, असे काही विद्यार्थ्यांनी म्हटले आहे तर काहींनी मात्र परीक्षा या घेतल्याच पाहिजेत अन्यथा ज्यांनी अभ्यासच केला नाही, असे विद्यार्थी पास होतील आणि त्याचा परिणाम इतर विद्यार्थ्यांवर होईल, असे काही विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.
शिक्षण संस्थाचालक, प्राचार्य यांनीदेखील परीक्षा घेण्यात याव्या, असे मत व्यक्त केले आहे. कोरोनामुळे परीक्षा घ्याव्यात की रद्द कराव्या, या संदर्भात गोंधळ सुरू आहे. परीक्षा न घेण्यावर ठाम असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. परंतु विद्यार्थ्यांमध्ये यावर मतभिन्नता दिसली. परीक्षेचे स्वरूप बदला पण परीक्षा घ्याच, असे काही विद्यार्थी म्हणत आहेत तर काहींनी आता अभ्यास विसरायला झाला आहे. संसर्ग होऊ नये म्हणून इतके दिवस घरात बसलो. परीक्षेला गेलो आणि संसर्ग झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न काही विद्यार्थी विचारत आहेत.

परीक्षा झाल्याच पाहिजेत. कारण विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता उत्तीर्ण केले तर पुढे जेव्हा ते उच्चशिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी ते जातील तेव्हा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा नक्की वेगळा असेल. हे विद्यार्थी परीक्षा न देता उत्तीर्ण झालेले आहेत असा शिक्का आमच्यावर लागेल. - योगिता मिठारे, केबीपी महाविद्यालय

ठाण्यात रुग्ण वाढत आहेत. कोरोनामुळे विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही. त्यामुळे आधीचे गुण पाहून अंतिम परीक्षेचे गुण द्यावेत. - आरती गांगुर्डे,
ज्ञानसाधना महाविद्यालय

परीक्षा रद्द व्हावी कारण सध्या आरोग्य महत्त्वाचे आहे. एखाद्या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण असतील आणि तेथील विद्यार्थी परीक्षेला आला तर संसर्ग होणार नाही का? त्यामुळे राज्य सरकारची भूमिका योग्य आहे.
- करण कांबळे, जोशी-बेडेकर महाविद्यालय

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा उशिरा का होईना पण त्या झाल्या पाहिजेत. भविष्यात या मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक अहवाल (ट्रान्स्क्रिप्ट) चा फायदा होईल. वाणिज्य, कला, विज्ञान या शाखांचे विद्यार्थी वेगवेगळ्या वेळी बोलवून परीक्षा घेतल्या जाऊ शकतात. फार तर कालावधी वाढेल पण विद्यार्थ्यांचे भविष्यातील नुकसानही टळेल. कोरोनामुळे शैक्षणिक नुकसान झाले आहे. मग परीक्षा रद्द करून त्यांचे आणखीन नुकसान का करावे.
- डॉ. चंद्रशेखर मराठे, प्राचार्य, ज्ञानसाधना महाविद्यालय

परीक्षा घेणार असतील तर पुरेशी दक्षता घेतली पाहिजे. अन्यथा रद्द करावी. आम्हाला गुण देण्यात अडसर येत असेल तर ‘वर्क फ्रॉम होम’ प्रमाणे ‘एक्झामफ्रॉम होम’ घेऊन गुण देण्यात यावे.
- तन्वी ठोसर, ज्ञानसाधना महाविद्यालय

एखादा मध्यममार्ग काढून परीक्षा व्हायला हवी. परीक्षा रद्द झाली तर वर्षभर केलेला अभ्यास वाया जाईल. उलट जे अभ्यास करत नव्हते ते पास होतील.
- श्रुती पांजरी, ज्ञानसाधना महाविद्यालय

कोरोनावर अद्याप लस आलेली नाही. कोरोनाचा प्रसार कसाही होऊ शकतो. त्यामुळे परीक्षा रद्दच व्हावी. विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा हा प्रकार होईल.
- साहिल वारेकर, जोशी-बेडेकर महाविद्यालय

परीक्षा या व्हायलाच हव्यात. त्या कशा पद्धतीने घ्याव्यात हे विद्यापीठाने ठरवावे. अंतिम वर्षाची परीक्षा दिल्यावर काही विद्यार्थी नोकरी करतात तर काही परदेशात उच्च शिक्षणासाठी जातात. त्यामुळे ते काय शिकले याचे मूल्यमापन होत असते. विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने परीक्षा घेणे महत्त्वाचे आहे.
- डॉ. विजय बेडेकर, शिक्षण संस्थाचालक

Web Title: coronavirus: Controversy over exam cancellation, fear of academic loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.