CoronaVirus News: कोरोनामुळे ‘ढाक्कुमाकुम’वर विरजण; दहीहंडीला आज शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 12:08 AM2020-08-12T00:08:10+5:302020-08-12T00:08:54+5:30
गोविंदा रे गोपाळा... यंदा घरातच वाजणार गाणी
ठाणे : दरवर्षी उत्कटतेने दहिहंडी सणाची वाट पाहणाऱ्या गोविंदांच्या उत्साहावर यावर्षी कोरोनाने पाणी फेरले. त्यामुळे बुधवारी या उत्सवाच्या दिवशी ढाकूमाकूमऐवजी सर्वत्र शुकशुकाट राहणार आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा उत्सव यावेळी रद्द झाला असला तरी, कोरोनामुळे एवढ्या वर्षांच्या परंपरेत खंड पडल्याची नाराजी गोविंदा पथकांमध्ये आहे.
दहीहंडी साजरा करण्याची जुनी परंपरा महाराष्ट्रात आहे. ठाण्याच्या दहीहंडी उत्सवाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. ठाण्याचा दहीहंडी उत्सव आता जागतिक स्तरावर पोहोचला आहे. परदेशी मंडळीदेखील शहरातील दहीहंडी उत्सवाला उपस्थिती लावत असतात. स्वाइन फ्लूनंतर कोरोनामुळे दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा परंपरेत खंड पडल्याची खंत ठाणे जिल्हा दहीहंडी समन्वय समितीने व्यक्त केली. स्वाइन फ्लूचा प्रसार झाला, तेव्हा मोठ्या दहीहंडी रद्द करण्यात आल्या होत्या. कोरोनामुळे मात्र छोट्या, मोठ्या सर्वच दहीहंडी रद्द करण्यात केल्याचे समितीचे समीर पेंढारे यांनी सांगितले. गुरू पौर्णिमेनंतर दहीहंडी सरावाचा श्री गणेशा गोविंदा पथक करीत असतात. दोन महिने हा सराव केला जातो. ठाणे शहरातील उत्सवाला मुंबई, नवी - मुंबई, कल्याण-डोंबिवलीचे गोविंदा पथकही मोठ्या संख्येने उपस्थिती लावतात. सकाळपासून या उत्सवाचा पूर्ण शहरात जल्लोष असतो. बोल बजरंग बली की जय, गोविंदा रे गोपाळा म्हणत या उत्सवाचा आनंद साजरा केला जातो. यंदा मात्र कोरोनामुळे हा उत्सव साजरा करत येणार नाही. उलट ठाणे शहरात शुकशुकाट दिसून येणार आहे.
महिला गोविंदा पथक फोडणार परंपरेची हंडी
वर्षानुवर्षे साजरा करण्यात येणारा दहीहंडी उत्सव यंदा कोरोनामुळे रद्द झाल्याने महिला गोविंदादेखील नाराज आहेत. कोपरीतील हेगडेवार मैदानात सकाळी ११ वाजल्यानंतर थर न लावता, सोशल डिस्टन्सिंग पाळून तीन ते चार महिलांच्या उपस्थितीत परंपरेची दहीहंडी रस्सीने फोडणार असल्याचे या पथकाचे प्रशिक्षक प्रवीण दळवी यांनी सांगितले.
उत्सव रद्द झाला असला तरी ठाण्यातील अनेक गोविंदा पथक श्रीकृष्णाची परंपरेने पूजा करून ही महामारी निघून जावी आणि पुढच्या वर्षी जोशाने हा उत्सव साजरा करता यावा, असे साकडे श्रीकृष्णाला घालणार असल्याचे पेंढारे म्हणाले.
मैदानात या उत्सवाचा उत्साह नसला तरी गोविंदाची गाणी लावून घरोघरी या उत्सवाचा आनंद लुटला जाणार असून, प्रथेप्रमाणे भगवान श्रीकृष्णाला पुजिले जाणार आहे.
भिवंडीत गोविंदा पथकांचा हिरमोड
भिवंडी : तरुणाईचा उत्सव अशी ओळख असलेल्या दहीहंडी उत्सवावर यंदा कोरोनाचे सावट असल्याने उत्सव साजरा करणाºया मंडळांनी या वेळी दहीहंडी न उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरातील गोविंदा पथकांचा हिरमोड झाला आहे.
मार्चपासून राज्यात थैमान घालणाºया कोरोना संसर्गाच्या भीतीने धार्मिक व सार्वजनिक उत्सव साजरे करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे गुढीपाडव्यानिमित्त निघणारी नववर्ष स्वागतयात्रा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीची मिरवणूक, मुस्लीम धर्मियांची रमजान व बकरी ईद प्रत्येकाने घरातच साजरी केली. त्यातच मंदिरे बंद असल्याने काही मोजक्या प्रमुख मंडळींच्या उपस्थितीत जन्माष्टमी साजरी करण्यात आली असून, बुधवारी दहीहंडी उत्सवसुद्धा साजरा केला जाणार नसल्याची माहिती युवा शक्ती मित्र मंडळ दहीहंडी उत्सवाचे आयोजक यशवंत टावरे यांनी दिली. दरवर्षी जन्माष्टमी व दहीहंडी नारपोली भंडारी चौक या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने पूजा करून हजारोंच्या उपस्थितीत साजरी होते. परंतु यंदा जन्माष्टमी सोहळा कार्यालयात केवळ पाच जणांच्या उपस्थितीत साजरा केला.
भादवड येथील स्व. महेंद्र समाजकल्याणकारी संस्थेच्या माध्यमातून होणारा उत्सव रद्द करून त्या पैशातून भिवंडी शहरातील जनतेकरिता एक रुग्णवाहिका लोकार्पण करणार असल्याचे माजी आमदार रूपेश म्हात्रे यांनी सांगितले. कपिल पाटील फाउंडेशनची शिवाजी चौक येथील दहीहंडी, अंजुरफाटा येथील राज मित्र मंडळाची दहीहंडी या शहरातील मानाच्या दहीहंड्या रद्द केल्याचे आयोजकांनी जाहीर केले. दहीहंडी उत्सवासाठी तब्बल एक महिना आधीपासून सरावाच्या तयारीस लागणाºया गोविंदा पथकांनी यंदा कोरोनामुळे सराव केला नाही.
नियमांचे पालन करणार
ज्ञानदीप मित्रमंडळ नागाव, आम्ही शेलरकर, डायमंड जिमको चावींद्रा ही शहरातील मुख्य गोविंदा पथके आहेत. या पथकांनी या वेळी आपापल्या मंदिरांत सामाजिक अंतर राखत फक्त जन्माष्टमी साजरी करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती ज्ञानदीप मित्रमंडळ नागावचे प्रमुख
शरद धुळे यांनी दिली.