coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाबळींचे अर्धशतक पार, दगावलेल्या रुग्णांमध्ये पुरुषांची संख्या जास्त
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 03:10 AM2020-05-11T03:10:55+5:302020-05-11T03:11:16+5:30
ठाणे जिल्ह्यात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण १३ मार्च रोजी ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत सापडला होता. तेव्हापासून ९ मेपर्यंत जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची २00६ इतकी झाली आहे.
ठाणे : कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या विषाणूच्या संसर्गामुळे जाणाऱ्या बळींची संख्या गेल्या नऊ दिवसांत दुपटीने वाढू लागली असून, ठाणे जिल्ह्यात कोरोनाबळींचे अर्धशतक पूर्ण झालेआहे. यामध्ये २४ रुण हे एकट्या ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात दगावल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. या व्हायरसने मुख्यत्वे पुरुषांवर झडप घातल्याने, दगावलेल्या रुग्णांमध्येही पुरुषच जास्त आहेत.
ठाणे जिल्ह्यात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण १३ मार्च रोजी ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत सापडला होता. तेव्हापासून ९ मेपर्यंत जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची २00६ इतकी झाली आहे. यामध्ये ठामपा हद्दीत सर्वाधिक ६७१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापाठोपाठ नवीमुंबईत ५९२, केडीएमसी ३0२, मिराभार्इंदर २४२, ठाणे ग्रामीण ७७, बदलापूर ५१, उल्हासनगर ३४, भिवंडी २१ आणि अंबरनाथ १३ असे रुग्ण सापडले आहेत. याचदरम्यान जिल्ह्यात कोरोनामुळे दगावणाऱ्यांची संख्या हळूहळू वाढून ती ५२ वर पोहोचली आहे. यामध्ये ४0 पुरुष तर १२ महिला रुग्णांचा समावेश असल्याचे स्पष्ट दिसत आहे. वयोगटानुसार विचार केल्यास 0 ते १0 वर्षे वयोगटातील एकही रुग्ण दगावलेला नाही. ११ ते ५0 वर्षे वयोगटात ८ रुग्ण, ५१ ते ६0 वर्षे वयोगटात आणि ६0 वर्षांपुढील वयोगात ४४ रुग्ण असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जिल्ह्यातील नवीमुंबई महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचा पहिला रुग्ण दगावला होता. आतापर्यंत ५२ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये ठामपा-२४, नवीमुंबई-१४, मिराभार्इंदर ७, केडीएमसी- ५, ठाणे ग्रामीण -२ आणि अंबरनाथ, बदलापूर व उल्हासनगर येथे प्रत्येकी एकाचा बळी गेला आहे. ज्या रुग्णांना मधुमेह, रक्तदाब किंवा विविध आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होता, अशा रुग्णांचा मुख्यत्त्वे बळी गेल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
२४ मार्च ते ३0 एप्रिलदरम्यान २५ जणांचा जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू झाला. १ ते ९ मेदरम्यान २७ जण दगावले. या नऊ दिवसांत दररोज एक तरी रुग्ण दगावल्याचे दिसत आहे. १, ५ आणि ६ रोजी प्रत्येकी ४ जण, २, ३, ७, ८ मे रोजी प्रत्येकी दोघे, तर ४ मे रोजी एक आणि ९ मे रोजी ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.