coronavirus: बाळकुम रुग्णालयातून कोरोना रुग्ण गायब, रुग्णालयाने दडवादडवी केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 02:19 AM2020-07-07T02:19:19+5:302020-07-07T02:21:28+5:30

कळव्यातील ७२ वर्षीय व्यक्तीचे हिमोग्लोबीन कमी झाल्याने त्यांना कळवा रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना बाळकुम कोविड रुग्णालयात २९ जूनला हलविण्यात आले.

coronavirus: Corona patient disappears from Balkum hospital | coronavirus: बाळकुम रुग्णालयातून कोरोना रुग्ण गायब, रुग्णालयाने दडवादडवी केल्याचा आरोप

coronavirus: बाळकुम रुग्णालयातून कोरोना रुग्ण गायब, रुग्णालयाने दडवादडवी केल्याचा आरोप

Next

ठाणे : बाळकुम रुग्णालयातून ७२ वर्षांची कोरोनाबाधित ज्येष्ठ व्यक्ती हरवल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यांच्या सुनेने रुग्णालयात फोन केल्यावर हा प्रकार उघडकीस आला. या रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणा चोख असतानाही रुग्ण बेपत्ता कसा झाला, प्रशासनाने ही माहिती दडवून का ठेवली व रुग्ण बेपत्ता झाल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवाल नातेवाईक करीत आहेत.

कळव्यातील ७२ वर्षीय व्यक्तीचे हिमोग्लोबीन कमी झाल्याने त्यांना कळवा रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना बाळकुम कोविड रुग्णालयात २९ जूनला हलविण्यात आले. त्यांच्या परिवारातील इतर सदस्यांना क्वारंटाइन केल्याचे त्यांची सून रेणुका यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, क्वारंटाइन केल्यामुळे आम्ही फोनवरच रुग्णालयाशी संपर्क साधून बाबांची चौकशी करीत होतो. त्यावेळी बाबा सुखरूप असल्याचे आम्हाला सांगितले जात होते. २ तारखेपर्यंत तेच कळविले जात होते, तसेच आम्हाला बेड नंबरही सांगितला होता. परंतु, ५ जुलैला मी माझ्या ओळखीच्या एका डॉक्टरांशी संपर्क साधून बाबांची चौकशी करण्यास सांगितले असता त्या बेडवर तुमचा रुग्ण नसल्याची समजले. आम्ही रुग्णालयाशी वारंवार संपर्क साधल्यानंतर आम्हाला चार दिवसांपासून रुग्ण रुग्णालयात सापडत नसल्याचे सांगण्यात आले. तसेच तुम्ही येऊन एकदा पाहणी करावी असेही सांगितले. त्यानुसार भावोजी व एक मित्र यांनी रुग्णालयात जाऊन पीपीई किट घालून सायं. ७ ते रात्री १२ पर्यंत रुग्णालयातील प्रत्येक बेड, स्वच्छतागृह सगळीकडे पाहणी केली. परंतु, बाबा कुठेही आढळून आले नाहीत, असे रेणुका म्हणाल्या.

६ जुलैला सकाळी १० वाजता पुन्हा रुग्णालयशी संपर्क साधला. परंतु, त्यांच्याकडून केवळ रुग्ण बेपत्ता असल्याचे सांगितले. अखेर आम्ही ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या डॉ. चेतना दीक्षित यांच्याशी संपर्क साधला. संघटनेचे पदाधिकारी आल्यावर रुग्णालयाचे डीन प्रो. शर्मा यांनी कापूरबावडी पोलिसात याबाबत तोंडी तक्रार दिल्याचे सांगितले. परंतु, अशी तक्रारच नसल्याचे रेणुका यांना पोलीस ठाण्याकडून सांगण्यात आले.

‘प्रशासनाने शोध घ्यावा’
रुग्णाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची संपूर्ण जबाबदारी रुग्णालयाची असते. माझ्या सासऱ्यांना पॅरालिसीसचा त्रास असल्याने ते स्वत: जास्त अंतर चालू शकत नाहीत. गेले सात दिवस रुग्णालयाने याविषयीची माहिती का दडवून ठेवली. प्रशासनाने रुग्णाचा शोध घेऊन नातेवाइकांना त्याविषयी त्वरित माहिती द्यावी, अशी आमची मागणी असल्याचे रेणुका यांनी सांगितले. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे त्या म्हणाल्या.

Web Title: coronavirus: Corona patient disappears from Balkum hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.