coronavirus: बदलापूरमध्ये सुरू होणार कोरोना चाचणी केंद्र, २४ तासांत मिळणार अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 12:43 AM2020-07-09T00:43:58+5:302020-07-09T00:44:45+5:30
येत्या आठवड्यात बदलापूर येथील ग्रामीण रुग्णालयात चाचणी केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी आणि बदलापूर, अंबरनाथचे प्रशासक जगतसिंग गिरासे यांनी दिली.
बदलापूर : बदलापूर, अंबरनाथ आणि ग्रामीण भागांतील कोरोना रुग्णांची चाचणी आता लवकरच बदलापूरमध्ये केली जाणार आहे. येत्या आठवड्यात बदलापूर येथील ग्रामीण रुग्णालयात चाचणी केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी आणि बदलापूर, अंबरनाथचे प्रशासक जगतसिंग गिरासे यांनी दिली. ठाण्याच्या पुढे सुरू होणारे शासनाचे हे पहिले कोरोना चाचणी केंद्र आहे. या केंद्रामुळे २४ तासांत अहवाल मिळणार आहे.
मुंबई, ठाणे परिसरांत कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. बदलापूर, अंबरनाथ आणि ग्रामीण भागांतील रुग्णांच्या कोरोना चाचणीसाठी स्वॅबचे सॅम्पल घेऊन जे.जे. रुग्णालयात जावे लागत आहे. आधीच मुंबई येथील चाचणीसाठी गर्दी, त्यात या भागांतून जाणारे सॅम्पल वाढत आहेत. त्यामुळे चाचणीचा अहवाल येण्यासाठी प्रचंड वेळ लागत आहे. हा विलंब टाळण्यासाठी आणि या भागातील रुग्णांना तत्काळ चाचणी अहवाल मिळून वेळीच योग्य ते उपचार मिळावे, यासाठी बदलापूर येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना चाचणी तपासणी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या आठवड्यात हे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या केंद्रामध्ये चाचणी होऊन २४ तासांत अहवाल प्राप्त होणार असल्याने रुग्णांना पुढील उपचार करणे सोयीचे होणार आहे.बदलापूर, अंबरनाथ आणि ग्रामीण भागांतील रुग्णांची फार मोठी सोय होणार आहे. मुंबई येथे जाण्याचा वेळ, पैसा आणि श्रम वाचणार आहेत.
ऑक्सिजनविना कोरोनाग्रस्तांची तडफड
बदलापूरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना याठिकाणी आरोग्यव्यवस्था कूचकामी ठरत आहे. ज्या रुग्णांना श्वसनाचा त्रास होत आहे, अशा रुग्णांना ऑक्सिजनची कोणतीच सुविधा बदलापूरमध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे ऑक्सिजनविना येथील रुग्णांची तडफड सुरू झाली आहे. बदलापूरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या हजारांच्यावर गेली असून रोज ४० ते ५० रुग्ण नव्याने सापडत आहेत. त्यातील काही रुग्णांची प्रकृती ही गंभीर असून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी शहरातील कोणतेच रुग्णालय पुढे येत नाही.
पालिकेच्या केअर सेंटरमध्ये लक्षणे असलेल्या परंतु कोणताही त्रास होत नसलेल्या रुग्णांवर उपचार केले जातात. उपचार घेत असताना श्वसनाचा त्रास झाल्यास त्या रुग्णाला थेट सिव्हिल रुग्णालयात पाठवण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, सिव्हिल रुग्णालयातही रुग्णांची संख्या वाढल्याने तेथे जागा उपलब्ध होत नाही. अशा परिस्थितीत प्रशासन संबंधित रुग्णाच्या नातेवाइकांनाच रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देत आहेत. काही रुग्णांना शहरातील एका खाजगी रुग्णालयात हलवून आपली जबाबदारी झटकत आहेत. या सर्व प्रकारामुळे गरीब रुग्णांचे हाल होत आहेत.