CoronaVirus :डोंबिवलीत पत्रकार, पोलिसांची कोरोना चाचणी, उद्या अहवाल येण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 07:36 PM2020-04-28T19:36:12+5:302020-04-28T20:10:11+5:30
CoronaVirus : आज डोंबिवली येथील हेरिटेज हॉलमध्ये पार पडलेल्या या शिबिरात एकूण 65 पत्रकारांची आणि 20 पोलिसांची कोरोना तपासणी करण्यात आली.
ठाणे : सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्यातर्फे आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा खा.डॉ.श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आज कल्याण लोकसभा मतदारसंघातील फिल्डवर कार्यरत असणाऱ्या पत्रकारांसाठी मोफत कोरोना तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. ICMR मान्यता असलेल्या इन्फेकशन या खाजगी लॅबद्वारे कोरोना स्बॅब तपासणी करण्यात आली. याचे अहवाल उद्यापर्यंत येणार आहेत.
आज डोंबिवली येथील हेरिटेज हॉलमध्ये पार पडलेल्या या शिबिरात एकूण 65 पत्रकारांची आणि 20 पोलिसांची कोरोना तपासणी करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने कल्याण - डोंबिवली - अंबरनाथ - उल्हासनगर- मुंब्रा - कळवा व ठाणे जिल्ह्यातील कोरोना वृत्तांकन करणाऱ्या सर्व खाजगी वृत्तवाहिनीमधील पत्रकार , कॅमेरामन, वृत्त निवेदक यांचा समावेश होता. तर प्रिंट मिडिया मधील अनेक पत्रकार, उपसंपादक, वार्ताहर यांनीही आजच्या शिबिराचा लाभ घेतला.
दरम्यान, गेल्या 2 आठवड्यांपासून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फौंडेशन, निऑन हॉस्पिटल आणि वन रुपी क्लिनिकच्या संयुक्त विद्यमाने 8 डॉक्टरांच्या 4 वैद्यकीय पथकाने संपूर्ण कल्याण लोकसभा मतदारसंघातील एकूण 37 हजार पेक्षा अधिक नागरिकांची थर्मल स्कॅनिंगच्या माध्यमातून कोरोना पूर्व तपासणी करण्यात आली.
या कोरोना पूर्व तपासणी शिबिरात स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे हे डॉक्टरच्या भूमिकेत स्वतः फिल्ड वर नागरिकांची तपासणी करत होते. फक्त थर्मल स्कॅनिंगवर न थांबता तपासणीत कोरोनासदृश सर्दी,ताप,खोकला आदि लक्षणे असलेल्या 150 जणांची कोरोना कोविड तपासणी देखील खाजगी लॅबद्वारे करण्यात आली.
आजपर्यंत एकूण 8 शिबिरांत एकूण 620 पत्रकार आणि पोलिसांच्या कोरोना तपासणी चाचण्या झाल्या असून या तपासणीत 12 पत्रकार पॉझिटिव्ह आढळले आहेत. या पत्रकारांना कोविड हॉस्पिटलमध्ये योग्य उपचारासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाकडून पाठपुरावा करण्यात येत आहे, अशी माहिती कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली आहे.