coronavirus: कोरोनामुळे कोसळणार आर्थिक डोलारा, ठाणे महानगरपालिकेची एप्रिल महिन्यात शून्य वसुली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 04:22 AM2020-05-10T04:22:55+5:302020-05-10T04:23:56+5:30
आधीच जकातीपाठोपाठ एलबीटी बंद झाल्याने महापालिकेस प्रमुख उत्पन्नाच्या स्रोतापासून कमी उत्पन्न येत आहे. त्यात आता कोरोनामुळे ठाणे महापालिकेची आर्थिक घडी विस्कटण्यास सुरुवात झाली आहे.
- अजित मांडके
ठाणे : लॉकडाउनमुळे नागरिकांच्या उत्पन्नावर जसा परिणाम झाला आहे, तसाच तो ठाणे महापालिकेच्या उत्पन्नावरही झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महापालिकेस मागील वर्षी एप्रिल महिन्यात २८.३६ कोटींचे उत्पन्न मिळाले होते. परंतु, यंदाच्या आर्थिक वर्षात एप्रिल महिन्यात महापालिकेच्या तिजोरीत इतिहासात प्रथमच शून्य उत्पन्न आले आहे. काही महिने कोरोनाचा प्रादुर्भाव असाच राहिला, तर आर्थिक स्रोत आटून महापालिकेचा आर्थिक डोलारा कोसळण्याची भीती आहे.
आधीच जकातीपाठोपाठ एलबीटी बंद झाल्याने महापालिकेस प्रमुख उत्पन्नाच्या स्रोतापासून कमी उत्पन्न येत आहे. त्यात आता कोरोनामुळे ठाणे महापालिकेची आर्थिक घडी विस्कटण्यास सुरुवात झाली आहे. आधीच मागील काही वर्षांत घेतलेल्या खर्चिक प्रकल्पांमुळे महापालिकेवर सुमारे ३,२०० कोटींचे दायित्व आहे. यामुळे येत्या काळात कामगारांचे पगार निघतील अथवा नाही अन् ठेकेदारांची बिलेदेखील निघतील की नाही, याबाबत आता शंका उपस्थित झाल्या आहेत. उत्पन्नाचे मुख्य स्रोत गेल्यानंतर तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी इतर स्रोत निर्माण करून ते वाढविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, मार्चमध्ये कोरोनाने दस्तक दिल्याने उत्पन्नावरही परिणाम होऊन ते २,३९७.६२ कोटी झाले आहे. आता त्याच्या आधारावरच काही महिन्यांचा गाडा हाकावा लागणार असून कर्मचाऱ्यांचे पगार, कोरोनाच्या उपाययोजनांवरील खर्च, ठेकेदारांची अत्यावश्यक कामांची बिले आदी द्यावीच लागणार आहेत. शिवाय ३,२०० कोटींच्या दायित्वापैकी थोडी रक्कमही द्यावी लागणार आहे.
आता नव्याने आलेले आयुक्त विजय सिंघल यांनी आतापासूनच उत्पन्न आणि खर्चाचा आराखडा तयार केला असून त्यातून किती आणि काय साध्य होणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच जास्तीच्या खर्चाचे प्रस्ताव रद्द करणे किंवा ते नंतर घेणे, यावर भर द्यावा लागणार आहे.
28.36 कोटींचे उत्पन्न मागील वर्षी एप्रिलमध्ये पालिकेला मिळाले होते. यंदा मात्र याच महिन्यात शून्य उत्पन्न प्राप्त झाले आहे. यामुळे महापालिका आता मालमत्ताकराची आणि पाणीबिलाची बिले तयार करीत असून ती ठाणेकरांना दिली जाणार आहेत. परंतु, सध्याची परिस्थिती पाहता ठाणेकर वेळेत बिल भरतील का? हेदेखील पाहणे महत्त्वाचे आहे.
कोटींचे उत्पन्न शहर विकास विभागास मागील वर्षी मिळाले होते. परंतु, आता कोरोनामुळे गृहप्रकल्पांवरदेखील परिणाम झाला असून नव्याने प्रकल्प येतील का? याबाबतही शंका आहे. त्यामुळे या प्रमुख उत्पन्नावरदेखील पाणी सोडावे लागणार आहे.