Coronavirus : मीरा -भाईंदरमध्ये कोरोनाचा दुसरा बळी; एकाच दिवसात ७ नवे रुग्ण आढळले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 10:38 PM2020-04-09T22:38:15+5:302020-04-09T22:38:38+5:30
५८ व २८ वर्षांचे पुरुष तर ५७ वर्षांची महिला कोरानाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले.
मीरारोड - मीरा-भाईंदरमध्ये आज गुरुवारी कोरोनाने दुसरा बळी घेतला. मीरा रोडच्या ७५ वर्षाच्या वृद्ध महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर शहरात कोरोनाचे नवीन ७ रुग्ण आढळून आले असून एकूण कोरोना रुग्णांची संख्या २९ झाली आहे. मीरा रोडच्या नित्यानंद नगरमधील गंगासागर येथे राहणाराया ७५ वर्षीय महिलेचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला. सदर महिलेच्या कुटुंबातील कोरोनाबाधित व्यक्तीच्या त्या संपर्कात आल्या होत्या. या शिवाय भाईंदरच्या गोडदेव गावातील साई चरण इमारतीत अणखी तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. ५८ व २८ वर्षांचे पुरुष तर ५७ वर्षांची महिला कोरानाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले.
नयानगरच्या पूजानगरमध्ये आणखी एक ७४ वर्षांची महिला कोरोना पॉझिटिव्ह निघाली आहे. मंगळवारी याच पूजा नगरमध्ये राहणा-या ५० वर्षीय इसमाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. नया नगरमधील ५० वर्षाच्या इसमास कोरोनाची लागण झाली असून, तो आखाती देशातून आलेला आहे. मीरारोडच्या विनय नगरमध्ये राहणा-या ३२ वर्षीय महिलेस कोरोनाची लागण झाली आहे. तिच्या ५६ वर्षीय सासूला आधीच कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या २९ झाली असून, ५३ जणांचे कोरोना चाचणी अहवाल अजून यायचे आहेत. २९ पैकी २ रुग्णांचा मृत्यु तर २ रुग्ण बरे झालेले आहेत.
त्यामुळे शहरात कोरोनाचे सध्या २५ रुग्ण असून १५१ जणांची कोरोना चाचणी केली असता, त्यात ७५ जणांचे निगेटिव्ह , २३ जणांचे पॉझिटिव्ह तर ५३ जणांचे अहवाल अजून यायचे आहेत. पालिकेच्या अलगीकरण केंद्रात ६३ जणं तर घरीच अलगीकरण ठेवलेल्यांची संख्या ४६६ इतकी आहे. भाईंदर येथील जोशी रुग्णालयात ५४ जणांना ठेवलेले आहे. यात काही कोरोनाचे रुग्ण तर काही अहवाल प्रलंबित असल्याने ठेवलेली लोकं आहेत.